वीरपुत्र लान्स नायक रोहित नारायण पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
अमळनेर : विक्की जाधव.
कोळपिंप्री येथील वीरपुत्र तथा भारतीय सैन्य दलातील लान्स नायक रोहित नारायण पाटील (काटे) यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वीर जवानाच्या अंत्यसंस्कारावेळी परिसरातील नागरिकांसह नातेवाईक, माजी सैनिक, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वीरपुत्राला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

भारतमातेच्या सेवेसाठी आपले कर्तव्य बजावणाऱ्या रोहित पाटील यांच्या निधनाने कोळपिंप्री गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवाचे आगमन होताच उपस्थित नागरिकांनी भारत माता की जय, वीर जवान अमर रहे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. शासकीय इतमामात अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पडली.

रोहित पाटील यांच्या शौर्यपूर्ण सेवेला आणि देशासाठी दिलेल्या योगदानाला यावेळी उपस्थितांनी सलाम केला. एका वीरपुत्राला अश्रू नयनांनी अखेरचा निरोप देताना संपूर्ण कोळपिंप्री गाव भावुक झाले.