नवीन मराठी शाळेत दहीहंडी महोत्सव उत्साहात साजरा
चिमुकल्यांच्या गोविंदा पथकांनी फोडली दहीहंडी; शाळा परिसरात अवतरली गोकुळनगरी
अमळनेर : विक्की जाधव.
श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून येथील नवीन मराठी शाळेत दहीहंडी व गोपाळकाला महोत्सव उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. राधा-कृष्णाच्या वेशभूषेतील चिमुकले, ‘गोविंदा आला रे आला’चा जयघोष, पारंपरिक गीतांवरील बहारदार नृत्य आणि दहीहंडी फोडण्याचा रोमांचकारी सोहळा यामुळे शाळेचा परिसर जणू गोकुळनगरीतच परिवर्तित झाला होता.
सकाळी ९ वाजता कार्यक्रमास उत्साहात प्रारंभ झाला. शाळेच्या मैदानावर आकर्षक पद्धतीने सजविण्यात आलेली दहीहंडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमान्य शिक्षण मंडळाचे चिटणीस विवेकानंद भांडारकर, संचालक राजेंद्र खाडीलकर, अमळनेरचे गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी प्रतिभा सुर्वे, शाळेचे मुख्याध्यापक अतुल भोई तसेच केंद्रप्रमुख महेश पाटील, अमळनेर पंचायत समितीचे विशेष शिक्षक प्रशांत पाटील, किशोर पाटील, पंकज काटे, सीमा पाटील, मोनाली कापडणे या सर्व मान्यवरांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीचे विधिवत पूजन व आरती करण्यात आली.
यावेळी शाळेतील चिमुकले विद्यार्थी राधा आणि श्रीकृष्णाच्या मनमोहक वेशभूषेत सहभागी झाले होते. त्यांच्या निरागस आणि आकर्षक रूपाने उपस्थितांची मने जिंकली. ‘गोविंदा रे गोपाळा’ तसेच ‘मच गया शोर सारी नगरी रे’ या लोकप्रिय गीतांवर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बहारदार नृत्याने कार्यक्रमात रंगत भरली.
संस्कृती, परंपरा आणि आनंदाचा सुंदर संगम घडवून आणणारा हा दहीहंडी महोत्सव विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला. नवीन मराठी शाळेतील सर्व शिक्षकवृंदांच्या उत्स्फूर्त सहकार्याने हा कार्यक्रम अत्यंत आनंददायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.