अमळनेर शहरात कृष्णजन्मोत्सवाचा भक्तिमय जल्लोष..
‘कृष्ण जन्माला गं बाई…’च्या जयघोषात मंदिरे दुमदुमली; भजन-कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रमांना हजारो भाविकांची उपस्थिती.
अमळनेर : विक्की जाधव.
‘कृष्ण जन्माला गं बाई…’च्या गजराने अमळनेर शहरातील वातावरण भक्तिमय झाले. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शहरातील विविध मंदिरांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला. मध्यरात्री श्रीकृष्ण जन्माचा सोहळा होताच भाविकांनी जयघोष करत आनंदोत्सव साजरा केला.
जन्माष्टमीनिमित्त अनेक ठिकाणी भजन, कीर्तन, धार्मिक प्रवचन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी भाविकांना मिळाली. भजन-कीर्तनाच्या कार्यक्रमांना हजारो भाविकांची उपस्थिती लाभली. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ‘गोविंदा… गोपाळा…’च्या जयघोषात परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. विविध मंदिरांमध्ये आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आल्याने मंदिर परिसराचे रूप अधिकच खुलून दिसत होते.
महिला, बालक, तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनीही कृष्णजन्मोत्सवाचा मनमुराद आनंद घेतला. रात्री उशिरापर्यंत शहरातील अनेक मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. मध्यरात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्माचा क्षण होताच पाळणा हलवून, आरती व जयघोष करत भक्तांनी उत्साहाला उधाण आणले. भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात अमळनेर शहरात कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला.