दुष्काळग्रस्त पशुपालकांना दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल
पशुधनाची किमान संख्या असण्याची अट रद्द; वैयक्तिक लाभार्थी व शेतकरी गटांना अतिरिक्त लाभाची संधी
पुणे, प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
राज्यातील कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळी परिस्थिती जाहीर झालेल्या ३०४ तालुक्यांतील पशुपालकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजने’च्या अटी शिथिल केल्या आहेत. सन २०२६-२७ या वर्षासाठी विशेष सवलत देण्यात आली असून, पशुधनाची किमान संख्या असण्याची अट रद्द करण्यात आली आहे. तसेच, चारा उत्पादनासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्यास वैयक्तिक लाभार्थी आणि शेतकरी गटांना एकापेक्षा अधिक वेळा चारा बियाणे व ठोंबे मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
योजनेच्या ९ मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार, वैयक्तिक लाभार्थ्याकडे स्वतःचे किमान तीन ते चार पशुधन असणे आवश्यक होते. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे पशुपालकांना भेडसावणारी चारा टंचाई लक्षात घेऊन शासनाने ही अट चालू वर्षासाठी शिथिल केली आहे. त्यामुळे अधिकाधिक पशुपालकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
🟡वैयक्तिक लाभार्थ्यांना चार हजारांचे बियाणे
या योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांना एक हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत १०० टक्के अनुदानावर चार हजार रुपये किमतीचे चारा बियाणे दिले जाते. चारा उत्पादनासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्यास आणि प्रथमच लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नवीन अर्जदारांची मागणी प्रलंबित नसल्यास, पात्र लाभार्थ्यांना एकापेक्षा अधिक वेळा लाभ देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
🟤शेतकरी गटांना २० हजार रुपयांपर्यंत अनुदान
शेतकरी समूह किंवा गटांना पाच हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत १०० टक्के अनुदानावर २० हजार रुपये किमतीचे चारा बियाणे देण्यात येते. चारा उत्पादनासाठी पुरेसा पाणीसाठा असलेल्या गटांना नवीन अर्जदारांची प्रलंबित मागणी पूर्ण झाल्यानंतर, उपलब्धतेनुसार अतिरिक्त बियाणे वाटप करता येणार आहे.
🔸पाणीसाठ्याची खातरजमा आवश्यक
सर्वसाधारणपणे ही योजना वर्षातून एकदाच राबविली जाते. मात्र, दुष्काळी परिस्थितीचा विचार करून शासनाने यंदा अतिरिक्त लाभ देण्याची सवलत दिली आहे. त्यासाठी संबंधित क्षेत्रात चारा उत्पादनासाठी आवश्यक पाणीसाठा उपलब्ध असल्याची खातरजमा करणे बंधनकारक आहे. संबंधित उपायुक्त पशुसंवर्धन यांनी पाणीसाठा उपलब्ध असल्याचे प्रमाणित करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच, प्रथमच योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नवीन अर्जदारांची मागणी प्रलंबित नसल्याची खात्री करूनच अतिरिक्त बियाणे वाटप करण्याच्या सूचना जिल्हा व विभागीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. ही विशेष सवलत केवळ सन २०२६-२७ या वर्षासाठी लागू राहणार आहे.
🔷अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन
योजनेची अधिक माहिती मिळविण्यासाठी पशुपालकांनी १९६२ या कॉल सेंटर क्रमांकावर किंवा ९०६३१४२२९९ या व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.
दुष्काळजन्य परिस्थितीत पशुपालकांना आर्थिक दिलासा देणे आणि जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता वाढविणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. अटी शिथिल केल्यामुळे सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त चारा उत्पादन घेता येईल. योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी सांगितले.