सोलापूर ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई!
१७ किलो ९९४ ग्रॅम गांजासह १५ लाख ७९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; एक आरोपी अटकेत
माढा / प्रतिनिधी अजिनाथ कनिचे

सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थांविरोधात धडक कारवाई करत १७ किलो ९९४ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत गांजा, चारचाकी वाहन आणि मोबाईल असा एकूण १५ लाख ७९ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून, याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला अंमली पदार्थांविरोधात प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
या सूचनांनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पथक कारवाईसाठी कार्यरत होते. यावेळी पोलीस अंमलदार मनोज राठोड यांना गोपनीय माहिती मिळाली की, कामती पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोलापूर–मिरज महामार्गावरील इंगळगाव टोलनाक्याजवळून एका चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात गांजाची वाहतूक केली जात आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी सापळा रचला. संशयित वाहन येताच पोलिसांनी वाहन अडवून तपासणी केली. वाहनातील इसमाची चौकशी केली असता त्याने आपले नाव शुभम लालासाहेब काळे (वय २८) असे सांगितले. तो मूळचा लातूर येथील असून, सध्या आंबेडकर नगर, अर्ली कॉर्नर, जत, जिल्हा सांगली येथे राहत असल्याची माहिती प्रेस नोटमध्ये नमूद आहे.
वाहनातील पोत्यांची तपासणी केली असता त्यामध्ये ओलसर हिरव्या रंगाचा, पाने, बिया व बोंडे असलेला गांजा आढळून आला. पोलिसांनी ८ लाख ९९ हजार ७०० रुपये किमतीचा १७ किलो ९९४ ग्रॅम गांजा जप्त केला. तसेच संबंधित चारचाकी वाहन आणि मोबाईलसह एकूण १५ लाख ७९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
या प्रकरणी कामती पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०२/२०२६ नुसार अमली पदार्थ व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ च्या कलम ८(क) व २०(ब)(ii)(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, मोहोळ येथील प्रथमवर्ग न्यायालयाने त्याला १६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद आहे.
गांजा कोठून आणला आणि तो कुठे नेण्यात येणार होता, याचा तपास पोलीस करीत आहेत. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी तसेच कामती पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
