क्रीडा संकुलातील गैरसोयींवर तरुणांचा एल्गार! सुविधा द्या, अन्यथा आमरण उपोषण
अमळनेर : विक्की जाधव.
तालुक्यातील क्रीडा संकुलाच्या मैदानावर मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने पोलीस, सैन्य व वनरक्षक भरतीची तयारी करणाऱ्या शेकडो तरुण-तरुणींना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. भरतीसाठी मैदानावर घाम गाळणाऱ्या तरुणांच्या सरावात सुविधांचा अभाव अडथळा ठरत असून, प्रशासनाने या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. क्रीडा संकुलात आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून न दिल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही तरुणांनी दिला आहे.
क्रीडा संकुलात रात्रीच्या सरावासाठी प्रकाश व्यवस्था, पिण्याचे पाणी, योग्य रनिंग ट्रॅक, ओपन जिमची दुरुस्ती, दुचाकी व सायकलींसाठी पार्किंग, स्वच्छतागृह तसेच कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र जागा अशा मूलभूत सुविधांची कमतरता आहे. संध्याकाळनंतर पुरेसा प्रकाश नसल्याने सराव करताना अडचणी येतात. ओपन जिममधील खराब व तुटलेले साहित्य दुरुस्त करावे, फुटबॉलसाठी आवश्यक पोल उभारावेत, मैदानाला संरक्षक भिंत बांधावी आणि बाथरूमची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत.
या संदर्भात तरुणांनी तहसीलदार, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी तसेच केंद्रीय व राज्य क्रीडामंत्र्यांकडे निवेदनाच्या प्रती पाठवून लक्ष वेधले आहे. अमळनेर तालुका क्रीडा अधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले आहे. केवळ तात्पुरत्या उपाययोजना न करता सर्व आवश्यक सुविधांची कायमस्वरूपी पूर्तता करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. भरतीचे स्वप्न उराशी बाळगून मैदानावर मेहनत घेणाऱ्या तरुणांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याने प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. आता प्रशासन या मागण्यांची दखल घेऊन क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लावणार का, याकडे तरुणांचे लक्ष लागले आहे.