करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड): चालू वर्षी करमाळा तालुक्यातील झरे व परिसरात अत्यल्प पर्जन्यमान झाल्यामुळे गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर झरे गावासाठी दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी तातडीने सोडून तलाव भरून देण्यात यावा, अशी मागणी झरे येथील ग्रामस्थांनी कुकडी डावा कालवा उपविभाग क्र. १२ च्या उपविभागीय अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तहसीलदार, करमाळा यांच्या ०८/१०/२०२६ रोजीच्या संदर्भिय पत्रानुसार १३/१०/२०२६ रोजी झरे गावासाठी दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी सुरू करण्यात आले होते. परंतु, सदर पाणीपुरवठा काही वेळातच अचानक बंद करण्यात आला. पाणीपुरवठा बंद होण्यामागे राजकीय हस्तक्षेप असल्याची जोरदार चर्चा ग्रामस्थांमध्ये असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
सध्या गावात पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या पाण्याच्या प्रश्नाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. त्यामुळे कोणत्याही कारणास्तव पाणीपुरवठा बंद न ठेवता दहिगाव योजनेचे पाणी सोडून झरे गावातील तलाव त्वरित भरून द्यावा, अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
यामध्ये दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी झरे गावासाठी तातडीने पूर्ववत सुरू करावे, आवश्यकतेनुसार गावातील तलाव भरून देण्यात यावा व सुरू झालेला पाणीपुरवठा बंद करण्यामागील कारणांची निष्पक्ष चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
दिनांक १५/१०/२०२६ पर्यंत प्रशासनाने यावर सकारात्मक कारवाई करून पाणी सुरू न केल्यास, १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजता झरे ग्रामस्थांच्या वतीने जनावरांसह आणि महिलांसह टप्पा क्रमांक २, डीसी, करमाळा-टेंभूर्णी महामार्गावर तीव्र ‘रस्ता रोको’ आंदोलन छेडले जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी सोलापूर, उपविभागीय अधिकारी माढा, तहसीलदार करमाळा आणि पोलीस निरीक्षक करमाळा पोलीस स्टेशन यांना माहिती व पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत.