वेदनेला अंत नाही…अन कुणाला खंत नाही… राख मी झाल्यावरी गीते तुला माझी कळावी!

अपनी भाषा में पढ़े! Translate

792029987_1744228430207111_5255494741468262663_n
वेदनेला अंत नाही…अन कुणाला खंत नाही…
राख मी झाल्यावरी गीते तुला माझी कळावी!
परवाच्या एक तारखेला म्हणजे एक सप्टेंबर,२०२६ रोजी आम्ही दोघे बुडालो…..! मी म्हणजे लान्स नायक रोहित नारायण पाटील, जळगाव (महाराष्ट्र) आणि कमांडो अजय कुमार  भगत  (जम्मू) ….पोहता येत असूनही, आमचे प्रचंड कठीण प्रशिक्षण झालेले असूनही धरणाच्या पाण्याच्या भयावह प्रवाहापुढे आमचे प्रयत्न तोकडे पडले. आमचे तीन सहकारी मात्र सुदैवाने किना-याला लागले! परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो!
पुराच्या पाण्यात शोध आणि सुटका कार्य कसे करायचे याचे प्रशिक्षण सुरु होते. जागा होती हरियानातील नहान येथल्या गंगानगर येथील हथीनीकुंड हे प्रचंड मोठे,खोल धरण. आम्ही पाच जणांनी हेलीकॉप्टर मधून दोरीच्या साहाय्याने पाण्यात उद्या घेतल्या. अंगावर सर्व साहित्य होतेच. पाण्यात उतरताच एक यांत्रिक बोट आम्ही चालवणार होतो. त्यानुसार आम्ही पाचही कमांडो सैनिक त्या बोटीत स्वार झालो…..पण काहीच वेळात बोट बंद पडली….आणि उलटली…बुडाली….आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे पुढे वाहून जाऊ लागली. आम्ही पाण्यात उड्या ठोकल्या..पोहायला लागलो…तिघे जण सहाशे मीटर्स पोहत किना-यास लागले…पण मी आणि अजय मात्र पाण्याच्या धारेत अडकलो…खूप हातपाय मारले…लाईफ जाकेट होतं..ऑक्सिजन सिलेंडरही होतं….चारच दिवसांपूर्वी हातावर बांधलेल्या राख्यांच्या धाग्यांचे मनगटावरचे रंगही तसेच होते……पण देवाचे बोलावणेच आले त्याला करणार….त्याच्या हाकेला ओ द्यावीच लागते..नाईलाजाने मरणाच्या हातात हात दिला….पाण्यात!
हल्ली फार तर दोन अपत्ये असतात लोकांना. त्यातून एकुलतं एक असलेलं गमावलं गेलं की घरच्यांच्या दु:खाला पारावर उरत नाही…पण जावे त्यांच्या वंशा तेंव्हा कळे!
आम्ही दोघे बेपत्ता असल्याची बातमी तशी लवकरच आली प्रसिद्धी माध्यमांत…त्याच दिवशी…कारण सायंकाळी साधारण सहा वाजता हा प्रकार घडला. पण नंतरच्या दोन दिवसांत म्हणजे तीन सप्टेंबर पर्यंत आमचा शोध सुरु आहे, आम्ही सापडलो, न सापडलो याबाबत follow up घ्यायला मात्र फार कुणाला उसंत मिळाली, असं आढळलं नाही!
आज दुपारी साडेतीन वाजता माझा देह जिथून आम्ही पाण्यात पडलो तिथून सुमारे ८० किलोमीटर्सवर मिळून आला. अजयचा दोनशे किलोमीटर्सवर कुठेतरी मिळाला,असं म्हणतात…पाण्याचा प्रवाहच मोठा! सर्वांनी खूप प्रयत्न केले आम्हांला शोधण्यात. देशात तशी ही बातमी फार गाजली नाही…त्यामुळे देशवासियांनी आमच्या सुटकेसाठी प्रार्थनाही फारशा केल्या नसतील…असे वाटते आता!
तसे आम्ही PARACHUTE REGIMENT चे Commando सैनिक लाखांतून मोजकेच निवडले जातो. म्हणजे प्रशिक्षणासाठी आलेल्यापैकी केवळ चार पाच टक्केच टिकतात कठीण कसोट्यांमध्ये आणि commando बनतात…आम्ही दोघेही या निवडक सैनिकांपैकी होतो. मरणाला घाबरणे हे आम्हांला ठाऊक नसते. त्यामुळे आज पाण्यात पडलो तरी घाबरलो नाही…प्रशिक्षण पणाला लावत जीव वाचवण्याचा प्रयत्न केला…पण ईश्वेच्छा बलीयेसी म्हणतात ते खरे. खरं सांगू….मरण तर येतच असतं प्रत्येकाला…लढाईत ते आलं असतं तर आणखीन भारी झालं असतं!
आता आपल्या भारतीय सैन्याचा याबाबतीत खूप कडक protocol आहे. कारण चुकूनही चुकीची माहिती पसरू नये,अशी त्यामागील भूमिका आहे. कारण आज दिवसभर कुणीतरी माझं नाव आर्यन पाटील असं आणि अजय कुमारचं फक्त अजय एवढंच सांगत होतं म्हणे! यामुळे गोंधळ उडू शकतो. त्यामुळे आमची बातमी अधिकृतरीत्या जाहीर व्हायला उशीर लागू शकतो. त्यातून हरियाणा मधून मृतदेह गावी पोहोचायला वेळ लागेलच. त्यात शासकीय protocol असतोच.
त्यामुळे मृतदेहांची उत्तरीय तपासणी (Post Mortem) होते, ओळख पटवली जाते आणि आधी कुटुंबीयांना कळवले जाते आणि मग आमची अधिकृत संस्था बातमी जाहीर करते. हे सर्व बरोबरच आहे म्हणा….पण तोवर देश काय करतो? मिडिया काय करतो?
मान्य आहे, संप,निदर्शने,इतर देशांत आलेल्या आपत्ती,राजकीय घडामोडी यांच्या बातम्यांना मिडीयात अधिक मागणी असते…कारण जनतेची ती खास आवड आहे. परंतू आज तीन तारीख आहे….एक तारखेच्या बातमीनंतर दोन आणि आज अगदी अधिकृत माहिती येईपर्यंत कुणी फार काही चौकशी केली असं दिसलं नाही!
मागे खूप वर्षांपूर्वी एक लहानगा कूपनलिकेत पडला होता आणि तिथेच अडकला होता. त्याचे थेट प्रक्षेपण दाखवत होते तो मुलगा सापडेपर्यंत…..एखाद्या प्रिन्स सारखी वागणूक मिळाली त्याला…अर्थात ते चांगलेच झाले म्हणा. आजही बघा ना….कितीतरी बातम्यांमागे वार्ताहर धावत होते….आणि ते थेट दिसत होतं!
स्वत:ला मराठी वाहिन्या समजणा-या वाहिन्यांनी आज दिवसभरात आमच्या बाबतीत अवाक्षर काढल्याचे ऐकिवात नाही. असो. आमच्या बातम्यांना मागणी फारशी नसावी, त्यामुळे जाहिरातींचे उत्पन्नही कमीच असेल!
इकडे आमच्या घरी बहुदा वार्ता गेली आहे…..त्यांना आता अधिकृतपणे कळवले जाईलच…पण तो वर आमचा शोध सुरु आहे….कुठवर आले आहे शोधकार्य….याबाबत कुणी वाच्यता करताना दिसत नव्हतं. नाही म्हणायला काही इन्स्टा वाले त्यांना जमेल तसं काही सांगत होते. Reportedly असा एक शब्द वापरतात हे लोक….म्हणजे बातमी आहे…पण अधिकृत नाही असं म्हणतात…अशी त्यांची वाक्यरचना असते…म्हणजे सावधानतेने बातम्या सांगतात.
आता आज रात्रीपर्यंत सर्व औपचारिकता पूर्ण होईल आणि मला आणि अजयला बहुदा उद्या आमच्या घरांचे दर्शन होईल! मग मात्र आमचीच बातमी चालेल बराच वेळ. आमच्या घरच्यांचे रडणारे चेहरे, दृश्ये लोक त्यांच्या त्यांच्या मोबाईल्समध्ये टिपण्याचा आटापिटा करतील, reels तर ढीगभर. अर्थात याला आता काही इलाज नाही. पण कुटुंबियांचे रुदन,शोक,विलाप किती आणि कसा दाखवावा यावर काही निर्बंध नाही घालता येणार का? म्हणजे आम्ही जिवंत असतानाही हा विचार करायचो…कारण आमच्या हुतात्मा सैनिकांच्या देहांसोबत काहीवेळा आम्हीही गेलो आहोत. पण आता मात्र या गोष्टीचा आम्ही खरोखरच तटस्थपणे विचार करू शकण्याच्या स्थितीत आहोत.
मी म्हणत नाही..आमच्या मृत्यूचा राष्ट्रीय event व्हावा…पण या निमित्ताने देश आमची काळजी करतो आहे हे तरी आम्हांला समजले असते की. असो. तक्रार नाही…आपलं मन मोकळं करण्याचा प्रयत्न केला झालं!
प्रत्यक्ष युद्धात आणि तेही मोठ्या युद्धात सैनिक दगावला तरच त्याला हुतात्मा समजतात आपल्याकडे. पण देशरक्षणाचे प्रशिक्षण सुरु असताना मरण येणे हे सुद्धा हौतात्म्यच नव्हे काय?
असो. खुश रहना…अहले वतन…अब हम तो सफर करते हैं! काळजी घ्या. देशाला पुढील काळात तर सैनिकांची खूपच गरज पडणार आहे. वैद्य निदान गरज सरण्या आधी तरी जगायला पाहिजेत! सैनिकांविषयीची एवढी अनास्था महागात पडू शकते. पण काळजी करू नका…याचेही प्रशिक्षण असते सैनिकांना….कशाचाही विचार न करता कर्तव्य करीत राहण्यातच आम्ही जीवनाचे सार्थक मानतो.जय हिंद..जय हिंद की सेना! काळजी घ्या…!
राख आम्ही झाल्यावरी गीते आमची तुम्हांस कळावी…हा दैवयोग आहे!
तुमचेच कमांडो लान्स नाईक रोहित नारायण पाटील आणि कमांडो अजय कुमार…भारतीय सेना.!
(मनातल्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी हा केलेला तात्पुरता परकाया प्रवेश….काल्पनिक संवाद आहे हा…कोणाचेही मन दुखावण्याचा,व्यवस्थेवर अविश्वास दाखवण्याचा हेतू नाही…पण ज्या पद्धतीने प्रसारमाध्यमे वागतात, त्यामुळे जनता नाईलाजाने अनभिज्ञ राहते…ते योग्य वाटत नाही…म्हणून हे लिहिण्याचे धाडस. माहिती आणि छायाचित्रे साभार. पहिले छायाचित्र हुतात्मा कमांडो रोहित नारायण पाटील आणि दुसरे हुतात्मा कमांडो अजय कुमार यांचे आहे. संभाजी बबन गायके. ९८८१२९८२६०. हे लिहीपर्यंत म्हणजे ११.५३ पर्यंत कोणतीही अधिकृत बातमी जाहीर झालेली दिसली नाही. तशा काही मिडीयात बातम्या मात्र दिसतात. लेखात सुरेश भट यांच्या कवितेच्या ओळी वापरल्या आहेत. असो. जय हिंद!)

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!