शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात तंबाखू विक्री करणाऱ्यांवर बारामती पोलिसांचा दणका
COTPA अंतर्गत दोन विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल; तंबाखूविक्रीविरोधात मोहीम सुरूच ठेवण्याचा पोलिसांचा इशारा
बारामती, प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
शैक्षणिक संस्थांच्या परिसरात सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी बारामती शहर पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान दोन ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचे आढळून आल्याने संबंधित विक्रेत्यांविरुद्ध COTPA अधिनियम, 2003 च्या कलम 6(b) तसेच कलम 24 अन्वये कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6.10 वाजता फातिमानगर, जगतापमळा येथील मुस्कान टी हाऊस येथे तपासणी करण्यात आली. हे दुकान कारभारी धोंडिबा आण्णा सातव शाळेच्या प्रतिबंधित परिसरात असल्याचे आढळून आले. तेथे सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी ठेवून विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आल्याने गनीभाई बाबुलाल शेख (वय 61, रा. फातिमानगर, जगतापमळा) यांच्याविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात खटला रजि. नं. 07/2026 दाखल करण्यात आला.
यानंतर त्याच दिवशी सायंकाळी 6.30 वाजता खंडोबानगर येथील अमोल पान शॉपची तपासणी करण्यात आली. शैक्षणिक संस्थेच्या प्रतिबंधित परिसरात सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचे आढळल्याने शिल्पा अमोल भोसले (वय 35, रा. खंडोबानगर, बारामती) यांच्याविरुद्ध खटला रजि. नं. 08/2026 दाखल करण्यात आला.
COTPA कायद्यानुसार, शैक्षणिक संस्थेच्या बाह्य सीमाभिंत किंवा कुंपणापासून 100 यार्ड त्रिज्येच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास प्रतिबंध आहे. तसेच 18 वर्षांखालील व्यक्तींना तंबाखूजन्य पदार्थ विकण्यासही मनाई आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. बारामती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी शहरातील विविध शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांच्या परिसरातील पानटपऱ्या, चहाच्या टपऱ्या तसेच तंबाखू विक्री करणाऱ्या आस्थापनांची तपासणी केली.
या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक विलास मोरे, महिला पोलीस हवालदार रेश्मा काळे, महिला पोलीस शिपाई वनिता कदम, पोलीस शिपाई शंकर निंबाळकर, संतोष वीरकर आणि महिला पोलीस शिपाई स्वाती पंडित यांनी सहभाग घेतला.
विद्यार्थी आणि युवा पिढीला तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखू विक्रीला आळा घालण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही सातत्याने कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा बारामती शहर पोलिसांनी दिला आहे. तसेच सर्व पानटपरी चालक, दुकानदार व तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांनी 18 वर्षांखालील व्यक्तींना विक्री करू नये आणि शैक्षणिक संस्थांच्या 100 यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.