करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- करमाळा नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी जयवंत नलवडे, वरिष्ठ लिपिक शिवदास कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व नूतन केंद्र समन्वयक विक्रम राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत न.प. प्राथ. मुलींची शाळा नं. २ मध्ये सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील शिक्षण परिषद उत्साहात पार पडली. शाळेचे मुख्याध्यापक बलभीम शिंदे यांनी सर्वांचे स्वागत केले.
करमाळा नगरपरिषद प्राथमिक शाळांची उत्तम आणि दर्जेदार शैक्षणिक कामगिरी असल्याने आजही या शाळेमध्ये मोठ्या पटसंख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हीच गुणवत्ता आणि पालकांचा वाढता विश्वास या परिषदेत विशेषत्वाने कौतुकाचा विषय ठरला.
शिक्षण परिषदेमध्ये इयत्ता पहिलीच्या अध्यापनाबाबत शिक्षक संतोष माने यांनी, तर इयत्ता तिसरी व चौथीच्या प्रशिक्षण पद्धतीवर शिक्षिका वैशाली जगताप यांनी मार्गदर्शन केले. तसेच मुख्याध्यापक दयानंद चौधरी, मुख्याध्यापिका सुनंदा जाधव आणि मुख्याध्यापिका माया दाते यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत विचार मांडले. पंचायत समिती शिक्षण विभागाचे विषय तज्ञ अशोक माने यांनी आर्थिक बाबींवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान उर्दू शाळेतील नवीन शिक्षिका पठाण व मोमीन यांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय, इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचेही अभिनंदन करण्यात आले.
मुख्याध्यापक बलभीम शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने शिक्षण परिषदेचे नियोजन अतिशय उत्कृष्ट केले. परिषदेसाठी नगरपालिकेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका प्रज्ञा जोशी यांनी केले, तर आभार शिक्षिका उबाळे यांनी मानले. मुख्याध्यापक शिंदे व त्यांच्या टीमने केलेल्या या नियोजनाबद्दल सर्वांनी त्यांचे आभार मानले.