मी पत्रकार कसा झालो ?
पत्रकारिता हाच माझा श्वास!
आज मी एक नामांकित पत्रकार म्हणुन महाराष्ट्रास परिचित झालो आहे. या वाटचालीस जानेवारी १९८१ ला प्रारंभ झाला. त्याकाळी प्रा. रतनलाल सोनग्रा यांच्याशी माझे घरोब्याचे संबंध होते.
१९८० साली मी संपादित व प्रकाशित केलेल्या “कवडसे” या प्रतिनिधिक कविता संग्रहाचे प्रकाशन कवी प्रा. अशोक बागवे, प्रा. रतनलाल सोनग्रा व उपप्राचार्य प्रा. पद्माकर मराठे यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी मी सोनग्रा सरांना सांगितले होते की मला पत्रकारितेत स्वारस्य आहे.
यापूर्वी मी चांदीबाई महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या “पाथेय” या हस्तलिखिताचे संपादन केले होते. तसेच काही कविता व लेख प्रकाशित झाले होते. मी पत्रकारितेचे कोणतेही रीतसर प्रशिक्षण घेतले नव्हते. अनुभवही गाठीशी नव्हता.
एके दिवशी सोनग्रा सर मला दैनिक नवशक्तीच्या फोर्ट येथील कार्यालयात घेऊन गेले.त्यावेळी श्री पु. रा. बेहेरे हे नवशक्तीचे संपादक होते. सोनग्रा सरांनी माझी ओळख करून दिली. “हे दिलीप मालवणकर यांना पत्रकारिता करायची आहे.” *मालवणकर* हे आडनाव ऐकताच बेहेरे साहेबांच्या भुवया उंचावल्या. ते सहजच बोलून गेले, उद्यापासून लिहायला सुरुवात कर. ना अर्ज, ना मुलाखत, थेट नेमणूक. मी तर आश्चर्यचकितच झालो.याचे रहस्य असे की बेहेरे साहेब कोकणचे सुपुत्र. त्यांना मालवणी माणसांबद्धल कमालीचे प्रेम व आत्मविश्वास. त्यामुळे “मालवणकर” या एकमेव भांडवलावर मी फ्री प्रेस सारख्या मोठ्या वृत्तपत्राच्या “नवशक्ती” या मराठी दैनिकात प्रतिनिधी म्हणून रुजू झालो.
या नंतर मी नवशक्तीत रोज बातम्या, साप्ताहिक वार्तापत्र व प्रासंगिक लेख लिहू लागलो. या लेखनाला लोकप्रियता लाभू लागली. माझे काही लेख तर २-३ भागात क्रमशः प्रकाशित होऊ लागले. त्यामुळे संपादक बेहेरे आनंदित होत असत. ते अभिमानाने इतरांना सांगत- “बघा,आमचा गाववाला कसा लिहितो ते !” मला ते बोलत – “तू दमे पर्यन्त लिही.” या प्रोत्साहनामुळे मी सुसाट लिहीत राहिलो व आजवर दमायचे नाव काढलेले नाही. दरम्यान मी कोकण भवन येथे सार्वजनिक बांधकाम विभागातील designe circle मध्ये स्टेनोग्राफर म्हणून सरकारी नोकरीत लागलो. तिथे माझ्या हाताखाली मराठी व इंग्रजी typewriter असल्याने मी माझे लेख व बातम्या टंकलिखित स्वरूपात देऊ लागलो. माझे मथळेच इतके आकर्षक असत की उपसंपादक माझ्या बातम्या तात्काळ प्रकाशित करू लागले. कोणतीही काट छाट न करता माझे लेख व बातम्या प्रकाशित होऊ लागल्या. सुरुवातीपासूनच माझे लेख सडेतोड व वस्तूनिष्ठ असत. दैनिक नवशक्तीचे उप संपादक व कवी परेन शिवराम जांभळे हे कोकण भवन समोरील C. B. D. कॉलनीत राहत असत तर त्यांची पत्नी कोकण भवन मधील सेल्स टॅक्स मध्ये कार्यरत होत्या. त्यामुळे माझ्या बातम्या जांभळे यांच्या मार्फत नवशक्तीत विनासायास पोहचत असत. ते उपसंपादक असूनही त्यांनी माझ्या बातम्या कश्या नेऊ ? असा बडेजाव दाखवला नाही.त्याकाळी फॅक्स वा मेलची सुविधा नव्हती. अनेक वेळा मी नवशक्तीत बातम्या नेऊन देत असे. कधी कधी माझे मित्र बापू उपासनी (जे नरिमन पॉईंट येथे बँकेत कामाला होते) ते ही बातम्या नेऊन देत असत. नंतर नंतर मला फॅक्स कार्ड मिळाले, त्यावरून बातम्या लेख पाठवू लागलो.
नवशक्तीत पत्रकारिता करीत असताना मी कोकणभवन येथे सरकारी नोकरी करीत होतो. माझे राजकीय लेखन सडेतोड होते. त्यामुळे एकतर नोकरी किंवा पत्रकारिता या पैकी एकाची निवड करण्याची वेळ येऊन ठेपली. मी घरात सर्वात मोठा, घरची परिस्थिती हलाखीची होती. कमावता मी एकटाच. अश्यावेळी कायम स्वरूपी सरकारी नोकरी सोडणे मूर्खपणाच मानला जात होता. मी पत्रकारितेच्या इतक्या मोहात पडलो होतो की, मी तिला सोडू शकत नव्हतो. पत्रकारितेमुळे मला वलय प्राप्त झाले होते. मी फक्त माझ्या मातोश्रीस विचारले की, मी काय करू? ती बोलली “तुला जे योग्य वाटेल ते कर, तू जिथे लाथ मारशील तिथून पाणी काढू शकतो.” जन्मदात्या आईने दाखवलेला हा विश्वास हेच माझे भांडवल ठरले. मी पुढचा मागचा विचार न करता राजीनाम्यासह एक महिन्याचे वेतन माझ्या मित्रामार्फत कोंकणभवन येथे पाठवून दिले व तिथूनच सरकारी नोकरीला जय महाराष्ट्र केला.
आत्ता पूर्णवेळ पत्रकारितेला वाहून घ्यायचे ठरवले. त्याचवेळी पत्रकारिता हे उपजीविकेचे साधन असू नये, हे मी ठरवले. कारण त्यामुळे पत्रकारितेशी तडजोड करावी लागेल व लेखणीची धार बोथट होईल, याची मला जाणीव होती.
त्यामुळे मी तत्कालीन आमदार
सितलदास हरचंदणी याच्या मार्फत प्रिंटिंग प्रेस साठी कर्ज घेऊन छपाई व्यवसाय सुरू केला. आणि येथेच इतर व्यावसाईक कामांसोबत माझे स्वतःचे साप्ताहिक अजब लोकशक्ती २ ऑक्टोबर १९८७ रोजी धूमधडक्यात सुरू केले. मी जेव्हा नोकरी सोडली तेव्हा माझे वय अवघे ३१ वर्षे होते. माझी २७ वर्षांची सेवा शिल्लक होती. त्यामुळे मला लोकांनी वेड्यात काढले होते. मात्र आज ४० वर्षांनी मी इतिहास घडवून “वेडी माणसचं इतिहास घडवतात”
हे दाखवून दिले.
मी गेली ४६ वर्षे आदर्श पत्रकारिता करीत आहे. मी अनेक पत्रकारांना लिहिते केले. माझे ५ लेख संग्रह प्रसिद्ध झालेत. मी नवशक्ती सह दैनिक सन्मित्र, दैनिक जनादेश व माझ्या अजब लोकशक्ती मधून विपुल व वैशिष्ट्यपूर्ण लेखन केले. “गद्दारांना क्षमा नाही” सारखा ज्वलंत लेख संग्रह प्रकाशित केला. “उल्हास दर्पण” सारखा मौलिक संदर्भ ग्रंथ लिहिला. अजूनही हा लेखना
चा झंझावात सुरू आहे, सत्ताधाऱ्यांना व राजकारण्यांना झोडपून काढत आहे. महाराष्ट्रातील अनेक दैनिक माझे लेख अग्रक्रमाने प्रकाशित करतात.
मला अभिमान आहे की, “मी जे लिहितो ते शब्दन शब्द जसेच्या तसे प्रकाशित होते.” कोणताही शब्द वगळला जात नाही.कोणताही ही संपादक माझ्या लेखाला कात्री लावू शकत नाही. माझे समाज माध्यमावर प्रकाशित होणारे लेख व दैनिक, साप्ताहिकातील प्रकाशित लेख पडताळून खात्री करून घेता येईल. माझ्या पत्रकारितेच्या यशस्वीतेचे हेच खरे गमक आहे. मला पत्रकारितेचा कोणताही पुरस्कार लाभलेला नाही, परंतू माझ्या धारदार, सडेतोड व बिनधास्त पत्रकारितेमुळे भ्रस्टाचाऱ्यांची व राजकारण्यांची झोपमोड होते, हाच माझ्या पत्रकारितेचा मोठा सन्मान आहे.
प्रारंभी पत्रकारितेची कोणतीही पदवी व अनुभव नसताना आज “मालवणकरांची लोकशक्ती हेच माझे विद्यापीठ होते” असे एका नामांकित दैनिकाचा संपादक म्हणतो, यातच मी भरून पावलो. माझ्या पत्रकारितेचा हा झंझावात अखेरच्या श्वासापर्यन्त निर्भीडपणे सुरूच राहील, कारण पत्रकारिता हाच माझा श्वास आहे.
दिलीप मालवणकर
९८२२९०२४७०