तालुका विज्ञान मेळावा उत्साहात साजरा..
अमळनेर : विक्की जाधव.
समग्र शिक्षा जिल्हा परिषद गटसाधन केंद्र, पंचायत समिती अमळनेर यांच्या वतीने अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२६ उत्साहात पार पडला. यंदा ‘भारतीय ऊर्जा क्षेत्र २०४७ : भवितव्य, संधी व आव्हाने’ या विषयावर स्पर्धा घेण्यात आली. गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील अध्यक्षस्थानी होते. उद्घाटक म्हणून साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पाटील, तर प्रमुख पाहुणे म्हणून साने गुरुजी कन्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अनिता बोरसे व डी. ए. धनगर उपस्थित होते. स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रत्येक विद्यार्थ्याला विषय मांडणीसाठी सहा मिनिटांचा वेळ देण्यात आला. परीक्षक म्हणून नंदा पाटील व आकाश पाटील यांनी काम पाहिले. चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत डी. आर. कन्या हायस्कूलची मयुरी संदीप महाजन हिने प्रथम, साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचा मोहक मुकेश साळुंखे याने द्वितीय, तर पीबीए इंग्लिश मीडियम स्कूलचा सोहम अमोल भोसले याने तृतीय क्रमांक मिळविला. एस. एस. पाटील हायस्कूल, लोंढवे येथील जयेश निंबा पाटील याची उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी निवड करण्यात आली.
समारोपप्रसंगी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील, अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे, मुख्याध्यापक सुनील पाटील, मुख्याध्यापिका अनिता बोरसे व गणित मंडळाचे अध्यक्ष डी. ए. धनगर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व परीक्षकांनी मनोगत व्यक्त केले. विज्ञान मंडळाचे अध्यक्ष निरंजन पेंढारे यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन भाग्यश्री वानखेडे यांनी केले, तर आभार यशोदीप बागल यांनी मानले. विज्ञान शिक्षक दीपक महाजन, वैशाली पाटील, हर्षल पवार, भारती पाटील, एन. डी. पाटील, एस. एस. कसबे, डिंपल देसाई यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.