जिद्द, चिकाटी अन् स्केटिंगचा थरार! बारामतीच्या क्रिशिव लकडेचा ८० मिनिटांचा विश्वविक्रम.
केडगाव-चौफुला/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारकांना मानवंदना देण्याच्या उद्देशाने हा विश्वविक्रम उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
महाराष्ट्रातील विविध ठिकाणी हा विश्वविक्रम उपक्रम एकाच वेळी राबविण्यात आला.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून केडगाव चौफुला येथील शिवांजली रोड सिटी येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष स्केटिंग उपक्रमात बारामतीच्या ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या तब्बल ३० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. यामध्ये अकॅडमीच्या विद्यार्थ्यांने ८० मिनिटे न थांबता स्केटिंग करण्याचा जागतिक विश्वविक्रम पूर्ण केला.
या विश्वविक्रमाचे विशेष आकर्षण ठरला तो बारामतीचा अवघा चार वर्षीय चिमुकला कु. क्रिशिव रविना केशव लकडे.
क्रिशिवने यापूर्वी वयाच्या अवघ्या तीन वर्षी ७९ मिनिटे न थांबता स्केटिंग करण्याचा जागतिक विश्वविक्रम पूर्ण केला होता. यंदा त्याने स्वतःचाच विक्रम मोडत ८० मिनिटे न थांबता स्केटिंग करण्याचा नवा विश्वविक्रम पूर्ण केला.
विशेष म्हणजे, क्रिशिवच्या पायाला दुखापत झालेली असतानाही त्याने जिद्द आणि चिकाटी सोडली नाही. वेदनांवर मात करत त्याने सलग ८० मिनिटे स्केटिंग पूर्ण करून आपल्या ध्येयाला गवसणी घातली. त्याच्या या कामगिरीमुळे उपस्थित पालक, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींनी त्याचे कौतुक केले.
क्रिशिवच्या या विश्वविक्रमाची नोंद युरोपियन युनियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, फॉर्बेर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि युनायटेड अरब अमिरात वर्ल्ड बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थांनी घेतल्याचे सांगण्यात आले.
स्केटिंग हा खेळ केवळ शारीरिक कौशल्याचा नसून, पडल्यावर पुन्हा उठून पुढे जाण्याची शिकवण देणारा खेळ आहे. याच उक्तीचा प्रत्यय क्रिशिवने आपल्या कामगिरीतून दिला. पायाला दुखापत झालेली असतानाही त्याने हार न मानता जिद्द, आत्मविश्वास आणि चिकाटीच्या जोरावर विश्वविक्रम पूर्ण केला.
अवघ्या चार वर्षांच्या क्रिशिवने केलेली ही कामगिरी बारामतीसाठी अभिमानाची बाब ठरली असून, ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या ३० विद्यार्थ्यांनी विश्वविक्रमात सहभाग घेतल्याने बारामतीच्या क्रीडा क्षेत्रातही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या या विश्वविक्रमी कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.