‘मार्मिक’ने आधीच दिला होता इशारा! तहसीलदार सुराणा निलंबित; आता भाऊसाहेब थोरात यांच्याकडे लक्ष ‘मार्मिक’च्या बातमीचा दणका ठरला निर्णायक; आता थोरात यांची चिंता वाढली.
अमळनेर : विक्की जाधव.
अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील तापी नदीपात्रातील गौण खनिज चोरी व डिझेल प्रकरणात अखेर अमळनेरचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्यावर शासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार १२ ऑगस्ट रोजी ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून,
मार्मिक’ने यापूर्वीच २४ तासांच्या अल्टिमेटमपासून तहसीलदारांच्या खुर्चीवर टांगती तलवार असल्याचे वृत्त प्रसिद्ध करून या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला होता.
सावखेडा वाळूघाटावरील कारवाईनंतर संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. जप्त वाळूसाठ्यापोटी १२ लाख ७९ हजार ३४४ रुपये, तर उत्खननासाठी वापरण्यात आलेल्या डिझेल व यंत्रसामग्रीवर तब्बल १ कोटी ६१ लाख ७० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. या कारवाईत महसूल यंत्रणेची जबाबदारी आणि संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका तपासणीच्या केंद्रस्थानी आली होती.
या प्रकरणात तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्यावर यापूर्वीच निलंबनाची कारवाई झाल्यानंतर आता तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्यावरही शासनाने कारवाई केल्याने ‘मार्मिक’ने केलेल्या पाठपुराव्याला मोठी दखल मिळाल्याची चर्चा महसूल वर्तुळात सुरू आहे. मात्र, या कारवाईनंतरही प्रकरण पूर्णपणे शांत झालेले नाही. कारण आता चोपड्याचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्यावरही निलंबनाची टांगती तलवार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
दरम्यान, सुराणा यांच्या निलंबनाच्या शासन निर्णयाविरोधात जिल्ह्यातील महसूल अधिकारी संघटना एकवटली आहे. सुराणा यांनी गौण खनिज चोरीविरोधात केलेल्या कारवाईचे पुरावे सादर करून त्यांचे निलंबन मागे घ्यावे आणि त्यांना अमळनेर तहसीलदारपदी पूर्ववत नियुक्त करावे, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून महसूल विभागाच्या अपर सचिवांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सुराणा यांच्या निलंबनामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण झाले असल्याचे सांगत जळगाव जिल्हा महसूल संघटनेने अवैध गौण खनिजविषयक कारवायांवर पूर्ण बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे. सुराणा यांना अमळनेर येथे पूर्ववत करावे, अशी मागणी करण्यात आली असून, या निवेदनावर जिल्ह्यातील विविध प्रांताधिकारी, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी व महसूल अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
आता या संपूर्ण प्रकरणाचा पुढील टप्पा चोपड्याचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्याभोवती फिरू लागला आहे. सावखेडा प्रकरणात त्यांच्यावरही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यामुळे “सुराणा यांच्यावर कारवाई झाली, मग भाऊसाहेब थोरात यांच्यावर निर्णय कधी?” हा प्रश्न महसूल वर्तुळासह अमळनेर-चोपडा परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.
‘मार्मिक’च्या वृत्तानंतर सुरू झालेला पाठपुरावा, २४ तासांच्या खुलाशापासून तहसीलदारांच्या निलंबनापर्यंत पोहोचला आहे. आता सुराणा यांच्या निलंबनानंतर शासनाची पुढची नजर भाऊसाहेब थोरात यांच्यावर आहे का? थोरात यांचेही निलंबन होणार की त्यांना दिलासा मिळणार? की उचल बांगडी होणार.?? याकडे संपूर्ण चोपड्या सह अमळनेर तालुक्याचे लक्ष लागले आहे.