रुग्णवाहिकांचे सुधारित भाडेदर लागू; अधिक भाडे आकारल्यास दंडात्मक कारवाई
पुणे, प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
प्रादेशिक प्राधिकरणाच्या पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती कार्यक्षेत्रासाठी रुग्णवाहिकांचे सुधारित भाडेदर निश्चित करण्यात आले आहेत. हे दर रुग्णवाहिकेत रुग्ण बसल्यापासून परतीच्या अंतरासाठी लागू राहणार आहेत. निश्चित दरपत्रकापेक्षा अधिक भाडे आकारणाऱ्या रुग्णवाहिका चालक व मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिली.
सुधारित दरानुसार वातानुकूलित नसलेल्या मारुती व्हॅनसाठी २५ कि.मी. किंवा दोन तासांसाठी ७०० रुपये, त्यापुढे प्रतिकिलोमीटर १६ रुपये आणि प्रतीक्षा शुल्क १२५ रुपये प्रतितास राहणार आहे.
मारुती ईको व टाटा मॅजिकसाठी २५ कि.मी. किंवा दोन तासांसाठी ९०० रुपये, त्यापुढे प्रतिकिलोमीटर १७ रुपये आणि प्रतीक्षा शुल्क १२५ रुपये प्रतितास आकारता येईल.
महिंद्रा बोलेरो व फोर्स क्रुझरसाठी २५ कि.मी. किंवा दोन तासांसाठी १ हजार २०० रुपये, त्यापुढे प्रतिकिलोमीटर १८ रुपये आणि प्रतीक्षा शुल्क १५० रुपये प्रतितास निश्चित करण्यात आले आहे.
फोर्स टेम्पो ट्रॅव्हलरसाठी २५ कि.मी. किंवा दोन तासांसाठी १ हजार ५०० रुपये, त्यापुढे प्रतिकिलोमीटर २२ रुपये आणि प्रतीक्षा शुल्क १७५ रुपये प्रतितास राहणार आहे.
तर वातानुकूलित फोर्स टेम्पो ट्रॅव्हलर (आयसीयू) साठी २५ कि.मी. किंवा दोन तासांसाठी २ हजार ५०० रुपये, त्यापुढे प्रतिकिलोमीटर ३० रुपये आणि प्रतीक्षा शुल्क २५० रुपये प्रतितास निश्चित करण्यात आले आहे.
याशिवाय वाहनाच्या प्रकारानुसार प्रतिदिन अथवा ३०० कि.मी.साठी ४ हजार ते १० हजार रुपयांपर्यंत दर निश्चित करण्यात आले आहेत. इंधन, देखभाल, दुरुस्ती व चालकाचा खर्च वगळता प्रतिदिन १ हजार ते ४ हजार रुपयांपर्यंतचे दरही निश्चित करण्यात आले आहेत.
🔴अधिक भाडे आकारल्यास दंड
निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या रुग्णवाहिका मालक किंवा चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. पहिल्या गुन्ह्यासाठी ५ हजार रुपये, दुसऱ्या गुन्ह्यासाठी १० हजार रुपये, तर तिसऱ्या व त्यापुढील प्रत्येक गुन्ह्यासाठी २० हजार रुपये दंड आकारण्यात येईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिला आहे.
रुग्णवाहिका चालक व मालकांनी सुधारित दरपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.