धावत्या रेल्वेत सोडलेल्या चिमुकल्याचे आई-बाप वर्षभरानंतरही सापडेनात पालकांचा शोध घेण्यासाठी रेल्वे पोलिसांकडून १० हजारांचे बक्षीस; माहिती देण्याचे आवाहन
अमळनेर : विक्की जाधव.
अवघ्या महिनाभराच्या चिमुकल्याला धावत्या रेल्वेच्या डब्यात सोडून देणाऱ्या आई-वडिलांचा वर्षभरापासून शोध लागलेला नाही. ९ मे २०२५ रोजी भुसावळ–सुरत एक्सप्रेसच्या जनरल डब्यात हे नवजात बाळ आढळून आले होते. धरणगाव ते अमळनेरदरम्यान बाळाला सोडण्यात आल्याचे तपासात समोर आले असून, गेल्या वर्षभरापासून धुळे येथील शिशुगृहात त्याची देखभाल केली जात आहे.
या प्रकरणी रेल्वे पोलीस स्टेशन, नंदुरबार येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ४८/२०२५ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ९३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, बाळासोबत संबंधित असलेल्या महिलेचे वय अंदाजे २० ते २२ वर्षे आहे. मात्र वर्षभर तपास करूनही बाळाच्या आई-वडिलांचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी आता नागरिकांच्या मदतीचे आवाहन केले आहे.
या प्रकरणातील महिला किंवा बेवारस नवजात शिशूच्या पालकांबाबत कोणतीही माहिती असल्यास ती तातडीने रेल्वे पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असून, उपयुक्त माहिती देणाऱ्यास १० हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. रेल्वे पोलीस स्टेशन नंदुरबारचे प्रभारी अधिकारी राहुल त्र्यंबक शेजवळ यांनी नागरिकांनी पुढे येऊन तपासात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. संपर्क : ७०३०४४७००७ / ८७८८१५७८५८.