तंबाखू सोडा, आयुष्य जोडा!” दोधवदच्या नववीतील विद्यार्थिनींनी रांगोळीतून पुकारले व्यसनमुक्तीचे रान; तुकाराम मुंढे यांच्या विचारांचा घेतला ध्यास!
अमळनेर : विक्की जाधव.
येथील माध्यमिक विद्यालय दोधवद येथे ८० व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून *’तंबाखूमुक्त अभियान’* या विषयावर भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी समाजाला तंबाखू आणि सिगारेटच्या दुष्परिणामांची जाणीव करून देत एक स्तुत्य सामाजिक संदेश दिला.
या स्पर्धेत इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विद्यार्थिनींनी अतिशय कलात्मक आणि अर्थपूर्ण रांगोळी साकारली. त्यांच्या रांगोळीमध्ये तंबाखू आणि सिगारेटमुळे होणारे गंभीर आजार, मृत्यूचे भय आणि एकंदरीत समाजावर होणारा घातक परिणाम अतिशय प्रभावीपणे मांडण्यात आला होता. ‘तंबाखू सिगारेट मुक्त अभियान’ या विषयाला न्याय देत विद्यार्थिनींनी आपल्या कलेतून व्यसनमुक्तीची हाक दिली.
याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले आणि देशाच्या जडणघडणीत तरुणाईची भूमिका महत्त्वाची असून त्यांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी समाज घडवण्याचे आवाहन केले. या संदर्भात, प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीचा आणि समाजहिताच्या निर्णयांचा उल्लेख करत, त्यांच्यासारख्या आदर्श अधिकाऱ्यांकडून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्यात योगदान द्यावे, असे मत व्यक्त करण्यात आले.