प्रेमसंबंध, विवाहाची तयारी अन् तरुणीचा संशयास्पद मृत्यू; बारामतीत तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल!
बारामती | प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६ ऑगस्ट रोजी एका तरुणीचा आकस्मिक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अथर्व राजेंद्र मेहन (वय २७, रा. गजानन अपार्टमेंट, बारामती) याच्याविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३२५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १०६(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, तरुणीच्या मृत्यूचे निश्चित कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणीने बी.एस्सी. अॅग्रीचे शिक्षण पूर्ण केले होते. ती एमपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी ऑक्टोबर २०२५ पासून पुण्यात क्लास करीत होती. डिसेंबर २०२५ मध्ये तिचे अथर्व मेहन याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांना मिळाली. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांमध्ये विवाहासंदर्भात चर्चा झाली आणि एप्रिल २०२६ मध्ये दोघांचा विवाह करण्याचे ठरल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
घटनेच्या काही दिवसांपूर्वी तरुणी नेहमीपेक्षा शांत व गप्प राहत असल्याचे तिच्या आईच्या निदर्शनास आले. याबाबत तिच्या मैत्रिणीकडे विचारणा केली असता, अथर्व तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत असल्याचे तसेच तिला काही गोळ्या देत असल्याचे मैत्रिणीने सांगितल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.
६ ऑगस्ट रोजी दुपारी अथर्व कारमधून तरुणीला एमबीए प्रवेशाच्या कामासाठी टी.सी. कॉलेज येथे घेऊन गेला होता. सायंकाळी तरुणीने आईशी मेसेजद्वारे संपर्क साधला. त्यानंतर आईने व्हिडिओ कॉल केला असता ती अथर्वसोबत वाहनात असल्याचे दिसून आले.
सायंकाळी सुमारे सात वाजता आईने मुलीशी संपर्क साधला. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, त्यावेळी तरुणीने अथर्व तिला त्याच्या घरी घेऊन जाणार असून, त्याला तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत आणि तो तिला गोळी खाण्यास देणार असल्याचे सांगितले. आईने तिला त्याच्या घरी जाऊ नये आणि तातडीने घरी परतण्यास सांगितले.
रात्री सुमारे दहा वाजता तरुणीच्या मोबाईलवर आईने फोन केला असता अथर्वने फोन उचलला. तरुणीला चक्कर आल्याचे सांगून तो तिला घेऊन येत असल्याचे त्याने कळविले. त्यानंतर तिला प्रथम देवकाते हॉस्पिटल, त्यानंतर भोंईटे हॉस्पिटल आणि पुढे सिल्वर जुबली हॉस्पिटल येथे नेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
रात्री सुमारे १०.२० वाजता आई सिल्वर जुबली हॉस्पिटलमध्ये पोहोचली असता तरुणी स्ट्रेचरवर होती. तिची कोणतीही हालचाल होत नसल्याचे निदर्शनास आले आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांना समजले.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, अथर्वने तरुणीला बारामतीतील त्याच्या राहत्या घरी नेले होते आणि तेथे शारीरिक संबंध झाल्यानंतर तिला अचानक चक्कर आल्याचे सांगितले. मृत्यूपूर्वी काही तास आधी तरुणीने आईला अथर्व तिला गोळी देणार असल्याचे सांगितल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आईने अथर्वविरुद्ध संशय व्यक्त केला आहे.
दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणात सखोल तपास सुरू आहे. तरुणीला प्रत्यक्षात कोणते औषध, गोळी किंवा अन्य पदार्थ देण्यात आला होता का, दिला असल्यास तो कोणता होता, त्याचे सेवन झाले का, त्याचा प्रकृतीवर काय परिणाम झाला आणि त्याचा मृत्यूशी काही कारणसंबंध आहे का, याचा तपास करण्यात येत आहे. तसेच मृत्यूचे निश्चित वैद्यकीय कारण शोधण्यासाठी वैद्यकीय, रासायनिक, डिजिटल व तांत्रिक पुराव्यांची पडताळणी केली जात आहे.
तपास पूर्ण होईपर्यंत मृत्यूचे निश्चित कारण किंवा आरोपीकडून नेमके कोणते कृत्य झाले याबाबत कोणताही अंतिम निष्कर्ष काढण्यात आलेला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मृत तरुणीची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करीत आहेत.