वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांचा दणका! एका दिवसात २९ हजारांचा दंड; बेफाम वाहनचालकांचे धाबे दणाणले
अमळनेर : विक्की जाधव.
अमळनेर शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात वाहतूक शाखेने धडक कारवाई सुरू केली आहे. ट्रिपल सीट प्रवास, विना हेल्मेट दुचाकी चालविणे, नो-पार्किंगमध्ये वाहने उभी करणे, अवजड वाहनांच्या नियमांचे उल्लंघन तसेच इतर वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. या विशेष मोहिमेत अवघ्या एका दिवसात नियमभंग करणाऱ्या वाहनांकडून तब्बल २९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, अपघातांचे प्रमाण कमी व्हावे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य मिळावे या उद्देशाने वाहतूक शाखेची ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. यापुढेही नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला असून, सर्व वाहनचालकांनी हेल्मेटचा वापर करावा, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे आणि सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.