पूरामुळे अडकलेल्या प्रवाशांना अमळनेरकरांचा आधार; रोटरी क्लबचा स्तुत्य उपक्रम
अमळनेर : विक्की जाधव.
वापी विभागात आलेल्या मुसळधार पावसामुळे आणि पुराच्या परिस्थितीमुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. मार्ग बदलण्यात आल्याने ट्रेन क्रमांक २९७२ पटना–बांद्रा ही अमळनेर रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली. या ट्रेनमधील सुमारे एक हजार ते बाराशे प्रवासी अमळनेर स्थानकावर अडकून पडले असताना, संकटाच्या या क्षणी अमळनेरकरांनी पुन्हा एकदा आपल्या सेवाभावी संस्कारांची प्रचिती दिली.
प्रवाशांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी अमळनेरमधील विविध सामाजिक संस्था तत्काळ मदतीला धावून आल्या. रोटरी क्लब अमळनेरने पुढाकार घेत रेल्वे प्लॅटफॉर्मवर अडकलेल्या प्रवाशांसाठी तातडीने भोजनाची व्यवस्था केली. क्लबचे अध्यक्ष रोटे. महेश पाटील व सेक्रेटरी तथा उपनगराध्यक्ष रोटे. प्रशांत निकम यांच्या मार्गदर्शनाखाली हा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. रेल्वे प्रशासनाच्या समन्वयातून अल्पावधीत मोठ्या प्रमाणावर अन्न वाटपाची व्यवस्था उभी करण्यात आली.
रेल्वे स्थानक अधीक्षक अनिल शिंदे, सी.एम.आय. श्री. पांडे यांच्या सहकार्याने तसेच पश्चिम रेल्वेचे माजी झरुसिक सदस्य रोटे. प्रीतपालसिंग बग्गा यांच्या सूचनेने आणि प्रयत्नातून हा उपक्रम यशस्वी झाला. प्रकल्प प्रमुख म्हणून रोटे. प्रीतपालसिंग बग्गा यांच्यासह अभिजीत भांडारकर, कीर्तीकुमार कोठारी, रोहित सिंघवी, प्रतीक खंडेरिया, धीरज अग्रवाल, किशोर लुल्ला, ईश्वर सेनानी, राजेश बेदमुथा, सनी कोठारी यांच्यासह सर्व रोटेरियन सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. अमळनेरच्या नागरिकांनी व विविध संस्थांनी दिलेल्या सहकार्यामुळे संकटात सापडलेल्या शेकडो प्रवाशांच्या चेहऱ्यावर दिलासा आणि समाधानाचे हास्य फुलले. अशा प्रसंगी समाजाप्रती असलेली जबाबदारी कृतीतून सिद्ध करणारा हा उपक्रम अमळनेरच्या सेवाभावी परंपरेचा प्रेरणादायी आदर्श ठरला. अशी माहिती रोटरी क्लबचे पी.आर.ओ. रोटे. मकसूद बोहरी यांनी दिली.