बारामतीत ‘आरोग्यवारी अल्ट्रा रन-२०२६’ मुळे रविवारी वाहतुकीत मोठे बदल; नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
बारामती, प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने रविवारी (दि. २६ जुलै) “आरोग्यवारी अल्ट्रा रन-२०२६” या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बारामती शहरासह पुणे ग्रामीण परिसरातील विविध मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले असून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन बारामती शहर पोलिसांनी केले आहे.
ही स्पर्धा पहाटे ३.३० वाजता पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातून सुरू होणार असून वडकीनाला, दिवेघाट, सासवड, जेजुरी, मोरगाव आणि सुपा मार्गे बारामतीत दाखल होईल. बारामतीतील नटराज नाट्यकला मंदिर येथे स्पर्धेचा समारोप होणार असून सायंकाळी ५ ते ६ या वेळेत बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.
स्पर्धेत मोठ्या संख्येने धावपटू, मान्यवर आणि नागरिक सहभागी होणार असल्याने जिल्हाधिकारी, पुणे यांनी विविध मार्गांवरील वाहतूक तात्पुरती बंद ठेवून पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश दिले आहेत. जेजुरी, बेलसर, पारगाव, सुपा, सासवड, फलटण, निरा, बारामती आदी मार्गांवर वाहतुकीचे नियोजन करण्यात आले असून वाहनचालकांनी संबंधित पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
बारामती शहरात विराट हॉटेल, खंडोबानगर, कसबा, गुणवडी रोड, कुडगाव चौक, निमगाव चौक आणि निरा रोड हा मॅरेथॉनचा मुख्य मार्ग असणार आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत किंवा स्पर्धा पूर्ण होईपर्यंत या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे. तीन हत्ती चौक ते सय्यद चौक हा मुख्य मार्ग दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी बंद राहणार असून स्थानिक नागरिकांनी सर्व्हिस रोडचा वापर करावा.
वाहतूक नियंत्रणासाठी शहरातील प्रमुख चौकांमध्ये पोलीस अधिकारी, वाहतूक शाखेचे कर्मचारी, होमगार्ड आणि स्वयंसेवक तैनात करण्यात येणार आहेत. तसेच कोणतीही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मेडिकल कॉलेज हॉस्पिटल, सिल्वर ज्युबिली हॉस्पिटल, शासकीय आरोग्य यंत्रणा आणि १०८ रुग्णवाहिका सेवेशी समन्वय ठेवण्यात आला आहे.
नागरिक, वाहनचालक, व्यापारी आणि स्थानिक रहिवाशांनी प्रवासाचे आगाऊ नियोजन करावे, मॅरेथॉन मार्गावर अनावश्यक वाहने आणू नयेत, पर्यायी मार्गांचा वापर करावा तसेच वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीशैल रामचंद्र चिवडशेट्टी यांनी केले आहे. तसेच रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन वाहनांना प्राधान्याने मार्ग द्यावा आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही पोलिसांनी नमूद केले आहे.