पोलिओमुक्त भविष्यासाठी अमळनेर सज्ज; शहरातील विविध पोलिओ बुथ वरील कर्मचाऱ्यांनी पहिल्याच दिवशी साधले ८७ टक्के बालकांपर्यंत पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्टे
अमळनेर : विक्की जाधव.
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला अमळनेरकरांनी भरभरून प्रतिसाद देत आरोग्याबाबतची आपली जागरूकता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. शहरातील विविध पोलिओ बुथ, रेल्वे स्थानक, बस स्थानक तसेच मोबाईल पथकांच्या माध्यमातून दिवसभरात तब्बल १० हजार ८८९ बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस पाजण्यात आला. एकूण १२ हजार ९६२ लाभार्थ्यांपैकी पहिल्याच दिवशी ८७.०७ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आरोग्य विभागाला यश मिळाले.
या मोहिमेच्या यशामागे आरोग्य विभागासोबतच विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. रोटरी क्लब, लायन्स क्लब आणि विविध शैक्षणिक संस्थांनी मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला. तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परिक्षीत बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, मुख्याधिकारी गणेश शिंदे, सर्व सभापती, नगरसेवक आणि नगरसेविकांनीही विशेष सहकार्य करत मोहिमेला बळ दिले.
मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी आरोग्य सभापती रामकृष्ण पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरिष गोसावी, वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास महाजन, डॉ. राजेंद्र शेलकर यांच्यासह सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, दि. २९ जून ते ३ जुलै दरम्यान ३० पथके घराघरात जाऊन पाच वर्षांखालील बालकांना पोलिओचा डोस पाजणार असून, एकही बालक वंचित राहू नये यासाठी आरोग्य विभागाने पालकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.