बारामतीत जिल्हास्तरीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते बालकांना पोलिओ लसीचे दोन थेंब; पालकांना लसीकरणाचे आवाहन
बारामती, प्रतिनिधी – वर्षा

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत बारामती येथील महिला शासकीय ग्रामीण रुग्णालयात जिल्हास्तरीय मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून करण्यात आला.
यावेळी बोलताना पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी ‘पोलिओमुक्त भारत’ ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत, पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजणे अत्यावश्यक असल्याचे नमूद केले. पोलिओवर मात करण्यासाठी लसीकरण हा सर्वात प्रभावी उपाय असून प्रत्येक पालकाने जबाबदारीने जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन आपल्या बालकाचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
त्या म्हणाल्या की, या लसीमुळे बालकांचे आयुष्य सुरक्षित आणि निरोगी राहण्यास मदत होते. निरोगी बालक, निरोगी कुटुंब आणि निरोगी महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून पोलिओमुक्त महाराष्ट्राचा संकल्प अधिक बळकट करावा.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी कल्पना पंडित, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, महिला रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापू भोई, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून पोलिओमुक्त भारताच्या संकल्पाला अधिक बळ देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
