स्वयंरोजगार फेडरेशनच्या व्हा. चेअरमन पदी अमळनेरचे पन्नालाल मावळे बिनविरोध.
अमळनेर : विक्की जाधव.
स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांचे फेडरेशन मर्यादित, जळगाव जिल्हा यांच्या उपाध्यक्षपदी अमळनेर येथील सामाजिक व सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते पन्नालाल जोगीलाल मावळे यांची बिनविरोध निवड झाल्याने अमळनेर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जळगाव येथील आंबेडकर मार्केटमधील फेडरेशनच्या कार्यालयात पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत ही निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकार विभागाचे अधिकारी रविंद्र तायडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्व संचालकांनी एकमताने पारोळा येथील भगवान गंगाराम पाटील यांची चेअरमनपदी तर अमळनेरचे पन्नालाल मावळे यांची व्हा. चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्याचा निर्णय घेतला. सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, तळागाळातील संस्थांशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क आणि संघटनात्मक कामातील सक्रिय सहभाग यामुळे मावळे यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
दरम्यान, संस्थेचे संस्थापक माजी चेअरमन युवराज वाघ यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. फेडरेशनची निवडणूक बिनविरोध पार पडण्यासाठी सचिव जगदीश बोरसे व युवराज वाघ यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच लोक संघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय नेत्या प्रतिभाताई शिंदे यांनीही नवनिर्वाचित चेअरमन, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.