विद्यार्थिनींमध्ये क्रीडेची आवड निर्माण करण्यासाठी डी. आर कन्या शाळेतऑलिम्पिक दिनाचे आयोजन
अमळनेर : विक्की जाधव.
खानदेश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौपदीबाई रामचंद्रशेठ कन्या शाळेत मंगळवारी (दि. २३) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी या होत्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच क्रीडा साहित्यांचे पूजन करून ऑलिम्पिक मशाल प्रज्वलित करण्यात आली.
ऑलिम्पिक दिनानिमित्त शाळेत जंप रोप, धावणे आदी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने स्पर्धांमध्ये सहभाग घेत क्रीडाभावना, शिस्त आणि संघभावनेचे दर्शन घडविले. मुख्याध्यापिका सौ. सूर्यवंशी यांनी ऑलिम्पिक दिनाचे महत्त्व सांगताना निरोगी जीवनशैली, नियमित व्यायाम आणि जागतिक बंधुत्वाची भावना जोपासण्याचे आवाहन केले. तसेच भविष्यात भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावरील अधिकाधिक खेळाडू मिळावेत, यासाठी शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, नियोजन व संयोजन पर्यवेक्षक श्री. एस. पी. वाघ यांनी केले. यावेळी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती भारती आठवले, शिक्षक प्रतिनिधी सौ. पी. पी. जोशी, ज्येष्ठ शिक्षक श्री. एस. एस. माळी, श्री. के. आर. बाविस्कर, ज्येष्ठ क्रीडा शिक्षिका श्रीमती आर. एस. सोनवणे, श्रीमती एस. एस. देवरे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय समितीचे चेअरमन श्री. जितेंद्रभाऊ जैन व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.