करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):
विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासाला गती देण्यासाठी, श्री गिरधरदास देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मेडियम स्कूल व ट्विंकलिंग स्टार्स मध्ये आयोजित करण्यात आलेले तीन दिवसीय योगा शिबिर नुकतेच उत्साहात संपन्न झाले. दिनांक १८ जून ते २० जून दरम्यान चाललेल्या या शिबिराची सांगता २१ जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’च्या निमित्ताने भव्य सामूहिक सादरीकरणाने करण्यात आली.
या शिबिरात शाळेतील इयत्ता चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने आणि मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. या शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे डॉ. ओंकार चक्रधर पाटील हे याच शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. आपल्याच शाळेत येऊन त्यांनी विद्यार्थ्यांना योगसाधनेचे धडे दिले. डॉ. ओंकार हे सध्या बेंगळूरू (कर्नाटक) येथून ‘बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स’चे उच्च शिक्षण पूर्ण करत आहेत. त्यांच्यासोबतच योगाचार्य बाळासाहेब नरारे यांनीही विद्यार्थ्यांना विविध कठीण आसने सोप्या पद्धतीने करून दाखवली व त्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे समजावून सांगितले.
तीन दिवसांच्या या शिबिरात विद्यार्थ्यांनी योगगुरूंच्या मार्गदर्शनाखाली उत्तम सराव करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने प्राणायाम व कपालभाती, सूर्यनमस्कार, ताडासन, वृक्षासन आणि अर्धचक्रासन यासोबतच इतर अनेक आरोग्यदायी आसने शिकून विद्यार्थ्यांनी सामूहिक योगसाधना केली.
“आजच्या या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या युगात स्वतःला निरोगी व फिट ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी रोज योगासने करणे ही काळाची गरज आहे.”
— सुनीता देवी मॅडम (सर्वेसर्वा, नवभारत स्कूल)
या यशस्वी आयोजनाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी क्षीरसागर मॅडम यांच्या हस्ते तरुण योगगुरू डॉ. ओंकार पाटील यांचा विशेष सन्मान व सत्कार करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी शिकलेली आसने पाहून उपस्थित पालकांनीही शाळेच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.