करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) : विविध समस्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या करमाळा एसटी स्टँड परिसरात आता प्रशासनाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. स्टँडच्या आवारात अनधिकृतपणे खाजगी वाहने उभी करणाऱ्यांवर करमाळा पोलीस स्टेशनच्या वतीने धडक कारवाई करण्यात येत असून, या कारवाईचे प्रवाशांकडून स्वागत होत आहे.
करमाळा एसटी स्टँडचा परिसर हा प्रशासकीय वापरासाठी असताना, अनेक खाजगी वाहनचालक आपले वाहन स्टँडच्या मोक्याच्या ठिकाणी ‘पार्किंग’ करून बिनधास्तपणे शहरात फिरतात. यामुळे एसटी बसेसना आत येण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही. ही जागा जणू काही खाजगी मालमत्ताच असल्यासारखा वापर होत असल्याने प्रवासी आणि बस चालक दोघेही त्रस्त होते.
नियम धाब्यावर बसवणाऱ्या अशा वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी करमाळा पोलीस स्टेशनने कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी स्टँड परिसरात धडक मोहीम राबवून बेशिस्त वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे नियम पायदळी तुडवणाऱ्या वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.
एसटी स्टँड परिसरात गाड्या वेळेवर प्लॅटफॉर्म वर न लागणे, अस्वच्छता, चोरीच्या घटना किंवा अतिक्रमणे यांसारख्या समस्यांनी नागरिक आधीच त्रस्त होते. त्यातच या खाजगी वाहनांच्या पार्किंगमुळे एसटी स्टँड परिसरात नेहमीच कोंडी निर्माण होत होती. आता पोलिसांनी सुरू केलेल्या या कारवाईमुळे परिसरात मोकळीक मिळत असल्याने प्रवाशांनी या मोहिमेचे मनापासून कौतुक केले आहे.
“एसटी स्टँड परिसरात खाजगी वाहनांमुळे मोठी कोंडी व्हायची. पोलिसांची ही कारवाई अत्यंत योग्य आहे. मात्र, ही कारवाई केवळ दोन-चार दिवस न राहता ती नियमितपणे सुरू राहावी, जेणेकरून स्टँडचा परिसर कायमचा मोकळा राहील,” अशी प्रतिक्रिया एका नियमित प्रवाशाने व्यक्त केली आहे.
आता पोलीस प्रशासन ही कारवाई सातत्याने राबवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.