माझ्या शिवसेनेचा पुन्हा एकदा वटवृक्ष झालेला पाहू दे!
(ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांचा विशेष लेख )
प्रबोधनकार व बाळासाहेबांच्या अस्सल शिवसेनेचा आज ६० वा वर्धापन दिन आहे. तो साजरा करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त मूळ शिवसेनेस अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेस आहे. ज्या पक्षाची सुरुवातच अनैतिक व व्याभिचारी मार्गाने जून २०२२ साली झाली, त्या शिंदे गटाला ६० वा वर्धापन दिन साजरा करण्याचा नैतिक अधिकारच नाही. केंद्रातील मोदी- शाह या कपटी जोडीने एकनाथ शिंदे यांना फूस लावून व मुख्यमंत्री पदाचे आमिष दाखवून शिव सेना फोडली त्या फूटीर गटाला आपल्या गद्दारीचा चौथा वर्धापन दिन साजरा करायला काहीच हरकत नसावी.
मुळात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिव’सेना हा फूटीर गट आहे. त्याला अधिकृत पक्ष म्हणता येत नाही. मोदी सरकारची दडपशाही, ed, cbi, it, व निवडणूक आयोग इतकेच नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाच्या अभद्र महायुती मुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाचे अस्तित्व अद्याप टिकून आहे. वास्तविक सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी जी परीक्षणे व मत जाहीर केले होते, त्यावेळीच शिंदे गटाचे अस्तित्व संपायला हवे होते. परंतू त्यांनी विधान सभेच्या अध्यक्षाकडे म्हणजे राहुल नार्वेकर यांच्याकडे अपात्रतेचा निर्णय सोपावला तेच चुकीचे होते. पेशंट मेला आहे हे जाहीर करण्याचे सोडून त्यांनी वैध्यकीय तपासणी करुन तो जिवंत आहे की मेला हे जाहीर करण्याचे डॉक्टर वर सोपावले. पेशंट मेला आहे हे जाहीर करण्याची जबाबदारी सोपावली तो डॉक्टरच बोगस असल्यावर तो खरा निर्णय देणारच नाही. हे ठाऊक असूनही सर्वोच्च न्यायालयाने हा पवित्रा का घेतला? हे कालांतराने सर्वांच्या लक्षात आलेच.
ज्या देशपातळीवरील लक्ष असलेल्या व संविधानाच्या पक्षांतर बंदी कायद्याचा mile stone ठरावा असा निर्णय सहा महिन्यात होणे अपेक्षित असताना त्याला चार वर्षे प्रलंबित ठेवणे हा न्यायप्रियतेचा व संविधानाचा घोर अनादर आहे, हे यांना कसे समजत नाही? या ढिसाळ कारभाराचा फायदा मात्र एकनाथ शिंदे यांच्या फितूर गटास झाला. मोदी व शाह यांना हेच अपेक्षित होते.
आज शिव सेनेचा ६० वा वर्धापन दिन. गेल्या चार वर्षांपासून शिवसेनेला फूटीच्या शापाने ग्रासले आहे. त्यामागे भाजपाची सत्ता संपादनाची राक्षशी महत्वाकांक्षा आहे. भाजपाला एकहाती सत्तेचा हव्यास आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्ष फोडून कमकुवत करुन एकछत्री राजवट म्हणजेच शत प्रतिशत भाजपच्या हाती सत्ता ठेवायची आहे.तसा मराठी माणसाला व महाराष्ट्राला दुही व फन्दफितूरीचा शाप शिवाजी व संभाजी महाराजांच्या काळापासून आहे. शिव सेनाही याला अपवाद नाही. सुरुवातीच्या काळात बंडू शिंगरे यांनी शिवसेनेस आव्हान देत प्रतिशिवसेना काढली. तेही बाळासाहेब हयात असताना. त्यापाठोपाठ छगन भुजबळ यांनी बंडखोरी केली. मग नारायण राणे, गणेश नाईक, सतीश प्रधान असे बंडखोर उपजले. बाळासाहेबांचा करडा स्वभाव, करारी बाणा व धाक असतानाही ही बंडखोरी झाली. इतकेच काय बाळासाहेबांच्या हयातीतच ठाकरे कुटुंबात फूट पडली व राज ठाकरे यांनी मनसेची वेगळी चूल मांडली. याचाच अर्थ बाळासाहेबही बंडखोरी रोखू शकले नव्हते. परंतु बाळासाहेबांचे वैशिष्टय असे होते की ते निष्ठावंत शिवसैनिकांची पेरणी करुन त्यांच्यात शिवसेना, महाराष्ट्र व मराठी माणसाचे हित याची अशी मशागत करीत की एकवेळ नेते गद्दारी करतील परंतू शिवसैनिक गद्दारी करणार नाहीत. शिवसेना म्हणजे ठाकरे हे समीकरण लोकांच्या मनावर ठसवले ते बाळासाहेबांनी. म्हणूनच शिवसेना ही संघटना अभेद्य राहिली होती. बाळासाहेबांचा दरारा असा होता की शिवसेनेकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत होत नसे. पाकिस्तानच्या अतिरेक्या पासून बाळासाहेबांच्या जीवाला धोका आहे असे समजल्यावर बाळासाहेब डगमगले नाहीत. उलट गर्जना केली की, माझ्या शरीराला ज्या रंगाची गोळी चाटून जाईल तो रंग जगाच्या नकाशावरून नष्ट होईल. बाबरी पतनाची जबाबदारीही त्यांनी स्वतः वर घेतली होती.ती धमक आत्ता कोणतही नाही.
आज परिस्थिती बदलली आहे. पक्ष प्रमुख शांत, संयमी, सुसंस्कृत या इमेजच्या प्रेमात इतके गुंतले की, बाळासाहेबांचा धाक,दरारा उरला नाही. गद्दारी करणाऱ्याचा खोपकर होतो, ही दिघेसाहेबांची दहशत शिल्लक नाही. बंड करतानाच जर गद्दारांना तुडवले असते, घरावर, कार्यालयावर हल्ले झाले असते, एखादा आमदार मारला जरी गेला असता तरी इतर आमदार माघारी फिरले असते. विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेले असते तरी आमदारांच्या चड्ड्या पिवळ्या झाल्या असत्या. शिवसैनिकांना फक्त इशारा जरी केला असता तर सुरत मध्ये जाऊन त्यांनी या गद्दारांच्या मुसक्या आवळल्या असत्या. परंतु संयम व सुसंस्कृत मुखवटा आड आला आणि गद्दारांनी डाव साधला. आपण कपिल सिब्बल व मनू सिंघवी या सिनियर ऍडव्होकेटचे खिसे भरत राहिलो. त्याच वेळी शिव सैनिकांना – माझ्याकडे देण्यासारखे काहीच नाही म्हणून हात वर केले. शिवसैनिक अंगावर केसेस घेण्यास तयार होते पण त्यांना आदेश देणारे हात संयमचा पाठ शिकवत होते. कृष्णा देसाईच्या वेळी जर संयम बाळगला असता तर, लाल बावटा कधीच उतरला नसता. परप्रांतीयां विरोधात हटाव लुंगी बजाव पुंगी आंदोलन केले नसते तर परप्रांतीय माजले असते. त्यावेळचे शिवसैनिक भगव्याचा दांडा लाठीसाठी वापरत असत. म्हणून शिवसेनेचा दरारा देशभर होता. दिल्ली मातोश्री समोर झुकत होती.बंद करावा तर तो शिवसेनेनेच. नुसती हाक दिली तरी मुंबईसह महाराष्ट्र ओस पडत असे.
आज शिव सेनेस गृहीत धरले जात आहे. दरारा वा दहशत संपल्यात जमा झाली. परप्रांतीय, गुजराती, जैन, फेरीवाले, बेलगाम झाले आहेत. मुंब्रा येथील शाखेवर जेव्हा शिंदे गटाने अतिक्रण केले होते तेंव्हा खुद्द उद्धव ठाकरे हे शाखेस भेट देण्यास आले असता त्यांना हात हालवत परत जावे लागले होते. हा क्षण मी पाहिलेला अतिशय दुर्दैवी क्षण होता. पक्ष प्रमुख स्वतः येऊनही त्यांना शिंदे गटाने रोखले हीच घटना पुढील दुर्दैवाचे निमित्त ठरली . त्या ऐवजी पक्ष प्रमुख जिद्दीने पुढे गेले असते व त्याचे जे काही परिणाम व परिणीती झाली असती ती शिवसेनेस संजीवनी देणारी ठरली असती. परंतू पक्ष प्रमुख रिक्त हस्ते परतून ठाण्यातील नामांकित टीप टॉप प्लाझा या हॉटेल मध्ये पत्रकार परिषद घेतात, तिथेच शिंदेनी बाजी मारली. आणि पुढील सर्व निवडणुका जिंकल्या.
कोणत्याही पक्षात चढ उतार असतात, विजय व पराभव ही असतात. परंतू विरोधकांनी एकदा आपले पाणी जोखले तर कायमचा डरपोक ( ज्याला आपण संयमी म्हणतो ) असा शिक्का बसतो. चाळीस आमदार व बारा खासदार फुटले, ते सर्वच गद्दार होते का, सर्वच गुन्हेगार होते का? कुटुंब प्रमुख म्हणून आपण आपले कर्तव्य बजावण्यात कुठे कमी पडलो, उमेदवारी देताना निष्ठा तपासून/ जोखून पाहिल्यात का ? स्थानिक पदाधिकारी व शिवसैनिकांच्या भावना जाणून घेतल्या का ? तसे असते तर इतक्या मोठ्या संख्येने आमदार खासदार, पदाधिकारी व शिवसैनिक फुटले असते का? ज्यांना जायचे असेल त्याने जावे, मला फरक पडत नाही, ही वृत्तीच घातकी ठरली. घर फुटत असेल तर ते एकसंघ ठेवण्याची जबाबदारी ही कुटुंब प्रमुखाचीच असते.
आज ९ पैकी ६ खासदार फुटले, उद्या आमदारही फोडतील, उरले सुरले नगरसेवकही फोडतील.तरी आम्ही म्हणत बसायचे की खरी शिवसेना आमची ? आज ६० व्या वर्धापन दिनी शुभेच्छा देताना मन गहिवरून येते.मी शिव सेनेच्या ६० पैकी ५३ वर्षाच
च्या वाटचालीचा साक्षीदार आहे. निष्ठावंताना जपा, बडव्यांपासून सावध रहा, संधी साधूसाठी रेड कार्पेट अंथरताना, निष्ठावंताना डावलून नका, हे सांगून सांगून मी दमलो, मला पक्ष सोडणे भाग पाडले, तरी मी गद्दार झालो नाही, कोणत्याही पक्षात/ गटात गेलो नाही. बाळासाहेब व दिघेसाहेब यांना माझे दैवत मानून उपेक्षित जीवन जगत आहे. शिवसेनेचा वटवृक्ष होताना पहिला, लौकिक अर्थाने मी शिवसैनिक नसेनही, पण आयुष्यातील ५३ वर्षे ज्या पक्षात व्यतीत केली, त्या पक्षाची वाताहत होताना जीव तीळ तीळ तुटत आहे. येथून पुढे तरी सुगीचे दिवस यावेत, डोळे मिटण्यापूर्वी पुन्हा एकदा शिवसेना हा कल्पतरू व वटवृक्ष झालेला पाहण्याचे भाग्य लाभो, हीच आई भवानी व कुलदैवत बाळासाहेब व आदर्श दिघेसाहेबांकडे प्रार्थना.
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
९८२२९०२४७०
19 जून 2026