करमाळा प्रतिनिधी:- निरोगी शरीर आणि शांत मन हीच सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे. २१ जून २०२६ रोजी ‘जागतिक योग दिना’चे औचित्य साधून, करमाळा येथील प्रसिद्ध शिवकन्या अकॅडमी च्या वतीने महिलांसाठी एका विशेष मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वेताळ पेठ येथील नगरपंचायत वाडा परिसरात सकाळी ६:०० वाजता या शिबिराला सुरुवात होणार आहे.
महिलांच्या आरोग्यासाठी एक पाऊल या उपक्रमाची माहिती देताना शिवकन्या अकॅडमीच्या संस्थापिका प्रियांका गायकवाड यांनी महिलांना आरोग्याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, “स्त्री ही संपूर्ण कुटुंबाचा कणा असते. कुटुंबातील प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेताना ती स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. धावपळीच्या जीवनात स्वतःला वेळ न दिल्याने अनेक महिला कमी वयातच गंभीर आजारांना बळी पडत आहेत. हे चित्र बदलण्यासाठी आणि महिलांना सक्षम व निरोगी करण्यासाठी हे शिबिर एक छोटासा प्रयत्न आहे.”
याबाबत अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या की, गेल्या १३ वर्षांपासून मी करमाळा शहरात योग प्रशिक्षणाचे कार्य करीत असून योगासनांमुळे शरीरातील लवचिकता वाढते, रक्ताभिसरण सुधारते आणि रोगप्रतिकार शक्तीमध्ये मोठी वाढ होते. तसेच आजच्या तणावपूर्ण वातावरणात प्राणायम आणि ध्यानामुळे मनःशांती मिळते, ज्यामुळे चिडचिड कमी होऊन आत्मविश्वासात भर पडते. नियमित योगाभ्यासाने महिलांमधील हार्मोनल असंतुलन दूर होऊन थायरॉईड, पीसीओएस (PCOS) यांसारख्या समस्यांवर नियंत्रण मिळवणे शक्य होते.
शिवकन्या अकॅडमीने आतापर्यंत शेकडो महिलांना आनंदी व निरोगी जीवन जगण्यास मदत केली आहे. योगाचा नियमित सराव हा केवळ आजार दूर ठेवत नाही, तर जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोनही देतो. हे विशेष शिबिर तुमच्या आयुष्याला एक नवी सकारात्मक कलाटणी देऊ शकते.
२१ जून रोजी सकाळी ६:०० वाजता वेताळ पेठ येथील नागरपंचाच्या वाड्याच्या भव्य प्रांगणात उपस्थित राहून या योग शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन गायकवाड यांनी केले आहे तसेच अधिक माहितीसाठी किंवा प्रशिक्षणाबद्दल काही शंका असल्यास आपण शिवकन्या अकॅडमीशी ९६५७७९८१७९ या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
चला, योगाच्या साथीने स्वतःला घडवूया, आरोग्यसंपन्न भारत घडवूया!