आमदार आणि माजी आमदार एकमेकांवर करताहेत आरोप प्रत्यारोप तरीही अमळनेरकर तहानलेलेच.
अमळनेर : विक्की जाधव.
शहरातील पिंपळे रोड व वामननगर परिसरात गेल्या चार ते पाच महिन्यांपासून अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने संतप्त महिलांनी रविवारी नगरपालिकेत धडक देत प्रशासनाला जाब विचारला. परिसरात नवीन व्हॉल बसविण्यात यावा किंवा पिंपळे रोडच्या मुख्य जलवाहिनीला जोडणी देऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी महिलांनी केली. भर उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागत असताना प्रशासनाकडून मात्र केवळ आश्वासनांचा पाऊस पडत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
दि. १२ जून रोजी झालेल्या पाणीपुरवठ्यात वामननगर भागाला केवळ अर्धा तास पाणी मिळाल्याने नागरिकांचा संताप अधिकच वाढला आहे. यापूर्वी मार्च महिन्यातही नागरिकांनी लेखी निवेदन देऊन समस्या मांडली होती. नगरसेवक, पाणीपुरवठा सभापती, व्हॉलमन व मुख्याधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला. फोनद्वारे पाठपुरावा करूनही दुर्लक्ष होत असल्याने अखेर महिलांनी नगरपालिकेचा दरवाजा ठोठावला.
नगरपालिकेत पोहोचलेल्या महिलांना मुख्याधिकारी, नगराध्यक्ष किंवा पाणीपुरवठा सभापती भेटून न आल्याने नाराजी आणखी वाढली. अखेर त्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे निवेदन सुपूर्द केले. येत्या आठ दिवसांत पुरेसा व नियमित पाणीपुरवठा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा नागरिकांनी दिला. “आम्हाला आश्वासने नकोत, नळाला पाणी हवे,” अशी संतप्त भावना महिलांनी व्यक्त केली.
दरम्यान, शहरातील पाणीप्रश्नावर सध्याचे आमदार अनिल पाटील आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असताना नागरिकांनी दोघांवरही नाराजी व्यक्त केली आहे. “पाणीप्रश्न सुटण्याऐवजी त्यावर राजकारण अधिक होत आहे. नागरिकांच्या अडचणींशी कोणालाच देणेघेणे राहिलेले नाही,” अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. एका बाजूला मुबलक पाणी असल्याचे दावे केले जात असताना दुसऱ्या बाजूला नळ कोरडेच असल्याने प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षमतेवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.