पदभार स्वीकारताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची मोठी कामगिरी; पाच वर्षांपासून फरार आरोपीला अटक
शिक्रापूर/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
शिक्रापूर पोलीस ठाण्याचा पदभार नुकताच स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच मोठी कामगिरी करत पाच वर्षांपासून फरार असलेल्या गुटखा तस्करी प्रकरणातील आरोपीला जेरबंद केले आहे.
सुमारे ७८ लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात बापू उर्फ प्रवीण शंकर गवते हा आरोपी २०२१ पासून फरार होता. पोलिसांना सतत हुलकावणी देत तो ठिकाणे बदलत राहत होता. मात्र, शिक्रापूर पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी फरार आरोपींच्या शोधासाठी विशेष मोहीम सुरू केली.
या मोहिमेदरम्यान आरोपी चाकण परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि स्थानिक सूत्रांच्या मदतीने सलग तीन दिवस पाठलाग केला. अखेर गवते वस्ती, चाकण येथून आरोपीला अटक करण्यात आली.
शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पदभार स्वीकारल्यानंतर अल्पावधीतच केलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची कार्यशैली पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणातील फरार आरोपीला अटक झाल्याने पोलिसांच्या तपासाला नवी दिशा मिळाली आहे.
सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून त्याच्याकडे सखोल चौकशी सुरू आहे. या गुन्ह्याशी संबंधित आर्थिक व्यवहार, इतर आरोपी आणि तस्करीच्या नेटवर्कचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख, सोमनाथ कचरे तसेच पोलीस अंमलदार गणेश येळवंडे, नवनाथ केंद्रे आणि मयूर कुंभार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.