बारामती बसस्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीवर धडक कारवाई; २० वाहनांवर प्रतिबंधात्मक कारवाई
बारामती/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उत्पन्नवाढीसाठी तसेच उच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या अनुषंगाने बारामती एसटी बसस्थानक परिसरातील २०० मीटर नो-पार्किंग झोनमध्ये अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांविरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांसह अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार आणि पोलीस उपमहानिरीक्षक तथा मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा व दक्षता विभाग, स्थानिक पोलीस आणि बारामती आगार प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात आली.

बारामती बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीस प्रतिबंध घालण्यासाठी नियमितपणे अशा मोहिमा राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यामुळे एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवेला संरक्षण मिळण्यासोबतच बसस्थानक परिसरातील वाहतूक शिस्तही सुधारण्यास मदत होणार आहे.
ही कारवाई वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकारी विजय धनगर, राखण व पहारा निरीक्षक इंगळे, सुरक्षा निरीक्षक लादे, बारामती शहर वाहतूक पोलीस निरीक्षक मा.महेश स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये पोलीस कर्मचारी प्रदीप काळे, भोसले सर, आकाश कांबळे, सुनीता पाटील, शिरतोडे मॅडम तसेच बारामती आगार व्यवस्थापक मा.शिंदे सर, वाहतूक निरीक्षक पवार मॅडम व सावंत सर, सहायक कार्यशाळा अधीक्षक कदम यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, १२ जून रोजी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत नो-पार्किंग आणि अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मिळून एकूण २० प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.
एसटी प्रशासनाने नागरिकांना अधिकृत प्रवासी सेवांचा वापर करण्याचे आवाहन करत अवैध प्रवासी वाहतुकीला प्रोत्साहन न देण्याचेही आवाहन केले आहे.