बारामतीत पडीक घरात पाच महिन्यांच्या गर्भाचे अवशेष आढळले; पोलिसांकडून सखोल तपास सुरू
बारामती/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
बारामती शहरातील सर्वोदय नगर, आमराई परिसरातील एका पडीक घरामध्ये अंदाजे पाच महिन्यांच्या मानवी गर्भाचे अवशेष आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून सखोल तपास सुरू केला आहे.
दिनांक ४ जून रोजी सायंकाळी स्थानिक नागरिकांनी पडीक घरामध्ये संशयास्पद स्वरूपाचे मानवी अवशेष आढळल्याची माहिती बारामती शहर पोलीस स्टेशनला दिली. माहिती मिळताच प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
पंचांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या पंचनाम्यात घटनास्थळी मानवी स्त्री जातीचा अंदाजे पाच महिन्यांचा गर्भ आढळून आला. गर्भाची विघटन प्रक्रिया सुरू झालेली असून प्राथमिक निरीक्षणात तो बालिकेचा जैविक अवशेष असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, हा गर्भ घटनास्थळी कसा आला, त्यामागील नेमकी कारणे काय आहेत, तसेच संबंधित व्यक्ती कोण आहेत, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
पोलिसांनी घटनास्थळाचे छायाचित्रण, व्हिडीओग्राफी तसेच इतर पुरावे संकलित केले असून गर्भ पुढील वैद्यकीय तपासणी, शवविच्छेदन व वैज्ञानिक विश्लेषणासाठी सिल्वर जुबली हॉस्पिटल येथे पाठविण्यात आला आहे. वैद्यकीय अहवालानंतर या प्रकरणातील अनेक बाबी स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक २२४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ९४, २३८ व २३९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मा. अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड आणि प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार करे हे पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, या घटनेबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच या प्रकरणाशी संबंधित कोणतीही माहिती असल्यास ती तात्काळ बारामती शहर पोलिसांना कळवावी, असे आवाहन करण्यात आले असून माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.