धुळ्यातील अमोल नगरमध्ये रस्ता की ‘कॉन्ट्रॅक्टरचा शॉर्टकट’?

अपनी भाषा में पढ़े! Translate

file_00000000991871f5a6110da0003fa652

धुळ्यातील अमोल नगरमध्ये रस्ता की ‘कॉन्ट्रॅक्टरचा शॉर्टकट’?

रस्ता न खोदताच काँक्रीट टाकण्याची तयारी; ठेकेदार, अधिकारी आणि स्थानिक पुढाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह..

धुळे शहरातील अमोल नगर, वॉर्ड क्रमांक ६ मध्ये डॉ. अमित शर्मा यांच्या घरापासून ते उदय बिरारी यांच्या घरापर्यंत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याचे आवश्यक खोदकाम न करता थेट खडी टाकून काँक्रीट स्लॅब टाकण्याची तयारी सुरू आहे. कामाच्या ठिकाणी ना योग्य लेव्हलिंग दिसते, ना मुरूम भराव, ना रोड रोलरद्वारे दाबणी. अशा परिस्थितीत हा रस्ता किती दिवस टिकणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

सरकारी नियमांनुसार कोणत्याही काँक्रीट रस्त्यापूर्वी मजबूत बेस तयार करणे आवश्यक असते. मात्र येथे पाया मजबूत करण्याऐवजी वरवरची मलमपट्टी करून काम पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च होत असताना प्रत्यक्षात कामाचा दर्जा कुठे आहे, याचे उत्तर नागरिक मागत आहेत.

ठेकेदार, अधिकारी आणि स्थानिक पुढारी नेमके कोणासाठी काम करत आहेत?

सर्वात मोठा प्रश्न म्हणजे हे काम सुरू असताना संबंधित अभियंते, विभागीय अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी नेमके काय पाहत आहेत? जर काम निकृष्ट दर्जाचे होत नसेल तर नागरिकांच्या शंकांचे निरसन का केले जात नाही? आणि जर खरोखरच नियम धाब्यावर बसवून काम होत असेल, तर संबंधित अधिकाऱ्यांनी अद्याप कारवाई का केलेली नाही?

स्थानिकांमध्ये अशीही चर्चा आहे की, काही पुढाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करत आहे. विकासाच्या नावाखाली निकृष्ट कामे करून जनतेच्या पैशांवर डल्ला मारला जात असेल, तर त्याची जबाबदारी केवळ ठेकेदाराची नाही, तर अशा कामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची आणि मौन बाळगणाऱ्या पुढाऱ्यांचीही आहे.

आज रस्ता बनत आहे, उद्या तो खचला तर जबाबदार कोण?

ठेकेदार, अधिकारी की कामाच्या उद्घाटनासाठी फोटो काढणारे पुढारी? जनतेच्या पैशातून होणाऱ्या प्रत्येक कामाचा हिशोब जनतेला मिळालाच पाहिजे. अमोल नगरमधील या कामाची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करून संपूर्ण माहिती सार्वजनिक करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

“रस्ता बनतोय की भ्रष्टाचार झाकण्यासाठी काँक्रीटचा स्लॅब टाकला जातोय?”

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!