अमळनेरात भीषण पाणीटंचाई; जबाबदारी घेणार तरी कोण? चार महिन्याचे नगराध्येक्ष की अनेक वर्षा पासून सत्तेत असलेले लोकप्रतिनिधी.
अमळनेर : विक्की जाधव.
शहरात दिवसेंदिवस पाणीटंचाईचे संकट अधिकच गंभीर होत असून नागरिकांना अक्षरशः पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अनेक भागात आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या संतापाचा बांध फुटू लागला आहे. भर उन्हाळ्यात नागरिकांचे हाल होत असताना पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मात्र एकमेकांकडे बोट दाखवत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
चार महिन्यांपूर्वी मोठमोठी आश्वासने देत सत्तेत आलेले नगराध्यक्ष परीक्षित बाविस्कर यांच्यावर आता नागरिकांकडून थेट प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. निवडणुकीदरम्यान “अमळनेरचा विकास” आणि “२४ तास सुविधा” यांची भाषा करणारे नेते आज मूलभूत पाणीपुरवठाच सुरळीत करू शकत नसल्याची टीका सर्वसामान्यांतून होत आहे.
शहरातील महिलांना आणि नागरिकांना पाण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याने संताप वाढू लागला आहे.
फक्त नगराध्यक्षच नव्हे तर अनेक वर्षांपासून सत्तेभोवती फिरणाऱ्या नगरसेवकांवरही आता कामाप्रति प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. निवडणुकीत जनतेसमोर विकासाची स्वप्ने दाखवली जातात, मात्र प्रत्यक्षात प्रत्येक वार्डात पाणी, रस्ते, गटारी आणि स्वच्छतेच्या समस्या कायम असल्याचे चित्र आहे. “जनतेची सेवा” करण्याची शपथ घेणारे काही नगरसेवक आता जनतेपेक्षा ठेकेदारीत अधिक व्यस्त झालेत का? अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे.
पालिकेतील काही अधिकाऱ्यांवर आणि कथित मध्यस्थांवरही गंभीर आरोप होत आहेत. अनेकांची “सेटलमेंट” करून अनाजी” आर्थिक व्यवहारात व्यस्त असणाऱ्यांना स्वतःच्या प्रभागातील समस्या मात्र दिसत नसल्याची टीका नागरिक उघडपणे करू लागले आहेत. प्रशासनातील निष्क्रियता आणि राजकीय गटबाजीमुळे शहरातील मूलभूत प्रश्न अधिकच बिकट होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
दरम्यान, पाणीटंचाईचा प्रश्न लवकर मार्गी लागला नाही तर नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
उन्हाच्या झळांसोबत आता पाण्याच्या झळाही अमळनेरकरांना सहन कराव्या लागत असून “नेमकी जबाबदारी कोणाची?” चार महिन्याचे नगराध्येक्ष की अनेक वर्षा पासून सत्तेत असलेले लोकप्रतिनिधी हा प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात अधिक तीव्र होताना दिसत आहे.