“डिझेलअभावी मालवाहतूक ठप्प होण्याची भीती”
ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
अमळनेर : विक्की जाधव.
परिसरातील विप्रो कंपनीमध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर अवजड मालवाहू वाहने ये-जा करत असतात. या वाहनांना वेळेवर डिझेल उपलब्ध न झाल्यास मालवाहतुकीवर परिणाम होत असून उद्योग क्षेत्रालाही त्याचा फटका बसत आहे. त्यामुळे डिझेल पुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा, अशी मागणी ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची विनंती करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले की, डिझेल टंचाईमुळे मालवाहतूक विस्कळीत होत असून वाहनचालक व ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. विशेषतः औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक थांबू नये यासाठी अवजड वाहनांना प्राधान्याने डिझेल पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी असोसिएशनने केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरच योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली.