शहरात बाटली-ड्रमने पेट्रोल विक्रीचा धंदा तेजीत? प्रशासनाचे दुर्लक्ष की पंप चालकांची मनमानी!

अपनी भाषा में पढ़े! Translate

शहरात बाटली-ड्रमने पेट्रोल विक्रीचा धंदा तेजीत? प्रशासनाचे दुर्लक्ष की पंप चालकांची मनमानी!

 

अमळनेर : विक्की जाधव.

शहरात पेट्रोल आणि डिझेलची बाटल्या तसेच ड्रम भरून सर्रास विक्री होत असल्याचे चित्र समोर येत असून याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांपेक्षा बाटल्या आणि कॅन घेऊन येणाऱ्यांचीच अधिक गर्दी दिसून येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे इंधनाचा टँकर पंपावर पोहोचताच काही ठराविक ग्राहकांना फोन करून “या आणि ड्रम भरून घेऊन जा” असा निरोप दिला जात असल्याचा गंभीर आरोप देखील केला जात आहे.

नियमांनुसार पेट्रोल किंवा डिझेलची खुल्या स्वरूपात साठवणूक आणि विक्री धोकादायक मानली जाते. तरीही शहरात दिवसाढवळ्या बाटल्या, कॅन आणि मोठमोठ्या ड्रममध्ये इंधन भरून दिले जात असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एका ठिकाणी किरकोळ ठिणगी जरी पडली तरी मोठी दुर्घटना घडू शकते, याची जाणीव असूनही संबंधित विभाग आणि प्रशासन मात्र शांत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे “नेमकं कुणाच्या आशीर्वादाने हा प्रकार सुरू आहे?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

दरम्यान, काही पंप चालकांकडून नियमांना हरताळ फासत मोठ्या प्रमाणात इंधन विक्री केली जात असल्याने सामान्य वाहनधारकांना मात्र ताटकळत उभे राहावे लागत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने तातडीने शहरातील पेट्रोल पंपांची तपासणी करून बाटली आणि ड्रममधील इंधन विक्रीवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. अन्यथा भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!