इबोला विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारची अॅडव्हायजरी; प्रवाशांवर २१ दिवस विशेष नजर
नवी दिल्ली/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

इबोला विषाणूचा वाढता धोका लक्षात घेऊन भारत सरकारने नवीन आरोग्य अॅडव्हायजरी जारी केली आहे. आरोग्य सेवा महासंचालनालयाने (DGHS) कांगो, युगांडा आणि दक्षिण सुदान येथून भारतात येणाऱ्या किंवा त्या देशांतून ट्रान्झिट करणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष खबरदारीचे निर्देश दिले आहेत. या देशांमधील इबोला प्रादुर्भावामुळे विमानतळांवरील तपासणी आणि आरोग्य निरीक्षण अधिक कडक करण्यात आले आहे.
आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, संबंधित देशांतून येणाऱ्या प्रवाशांनी पुढील २१ दिवस स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. या काळात ताप, उलटी, तीव्र अशक्तपणा, डोकेदुखी, जुलाब, घशात वेदना किंवा शरीरातून असामान्य रक्तस्राव अशी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय तपासणी करून विमानतळावरील हेल्थ डेस्क किंवा आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती द्यावी.
🔷ट्रॅव्हल हिस्ट्री देणे बंधनकारक
DGHS च्या अॅडव्हायजरीनुसार, प्रवाशांनी आपल्या प्रवासाचा संपूर्ण तपशील आरोग्य अधिकाऱ्यांना देणे आवश्यक आहे. विशेषतः मागील २१ दिवसांत कांगो, युगांडा किंवा दक्षिण सुदानला भेट दिली असल्यास ती माहिती लपवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय, इबोला बाधित व्यक्तीच्या रक्त, शारीरिक द्रव किंवा थेट संपर्कात आलेल्या लोकांनीही अधिक सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
🔶विमानतळांवर स्क्रीनिंग वाढवली
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळासह देशातील अनेक आंतरराष्ट्रीय विमानतळांवर स्क्रीनिंग आणि हेल्थ मॉनिटरिंग अधिक कडक करण्यात आले आहे. संशयित प्रवाशांची तपासणी, आरोग्य चौकशी आणि संपर्क शोध मोहीम (Contact Tracing) यावर भर दिला जात आहे.
🟡थायलंडनेही घेतली खबरदारी
इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर थायलंडनेही आपल्या विमान वाहतूक व्यवस्थेत सतर्कता वाढवली आहे. थायलंडच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने (CAAT) इबोला प्रतिबंधासाठी विशेष उपाय लागू केले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कांगो आणि युगांडातील परिस्थितीला आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी (PHEIC) घोषित केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
थायलंडच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाने कांगो आणि युगांडा या देशांना ‘धोकादायक संसर्गजन्य रोग क्षेत्र’ म्हणून घोषित केले असून विमानतळांवर संयुक्त तपासणी आणि प्रतिसाद यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे.
🟢WHO ने काय म्हटले?
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक Tedros Adhanom Ghebreyesus यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, WHO च्या आपत्कालीन समितीने कांगो आणि युगांडातील इबोला परिस्थितीला आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी (PHEIC) म्हणून मान्यता दिली आहे. मात्र, सध्या ही परिस्थिती जागतिक महामारी म्हणून घोषित करण्यात आलेली नाही.
टेड्रोस यांनी यापूर्वीच दोन्ही देशांमधील परिस्थिती गंभीर असल्याचे सांगत आपत्कालीन घोषणा केली होती. सीमापार संसर्गाचा धोका वाढत असल्याने विविध देशांनी खबरदारीचे उपाय अधिक कडक करण्यास सुरुवात केली आहे.
🔴इबोला म्हणजे काय?
Ebola Virus Disease हा अत्यंत गंभीर आणि अनेकदा जीवघेणा संसर्गजन्य आजार मानला जातो. हा विषाणू संक्रमित व्यक्तीच्या रक्त, शारीरिक द्रव किंवा दूषित वस्तूंच्या संपर्कातून पसरतो. योग्य वेळी उपचार न मिळाल्यास मृत्यूदरही मोठा असू शकतो.
आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आणि लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घेण्याचे आवाहन केले आहे.