शेतकी संघाचा निवडणुकीत आमदार – खासदार आमने-सामने काँग्रेस मारणार मुसंडी ? तर मा.आ. यांची क्लिअर एक्झिट
अमळनेर : विक्की जाधव.
तालुका शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीत उमेदवारांना चिन्हांचे वाटप होऊन अंतिम यादी जाहीर करण्यात आली असून आता प्रचाराला वेग आला आहे. सहाय्यक निबंधक कार्यालयात पार पडलेल्या प्रक्रियेनंतर सर्व उमेदवारांना समान चिन्ह देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील व माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेल रिंगणात उतरवले असून या पॅनेलमध्ये १५ उमेदवारांचा समावेश आहे. तर भाजपकडून खासदार वाघ यांच्या नेतृत्वाखाली किसान विकास पॅनेल जाहीर करण्यात आले असून त्यात १४ उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. काँग्रेसने प्रा. सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी पॅनेल जाहीर केले आहे. या पॅनेलमध्ये सुद्धा १० उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष आमने-सामने आले असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसने देखील या निवडणुकीत जोरदार उडी घेतली आहे. मात्र माजी आमदार शिरीष चौधरी तसेच शिवसेना शिंदे गटाने एकही उमेदवार न दिल्याने ते या निवडणुकीपासून अलिप्त राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढेही ते कोणत्या निवडणुकीत उमेदवार देतात की नाही यावरी शंका निर्माण होत आहेत.
तालुकाभर विखुरलेल्या मतदारसंघामुळे उमेदवारांना प्रचारासाठी मोठी धावपळ करावी लागणार आहे. प्रचंड उन्हात प्रचाराची रणधुमाळी रंगणार असून प्रत्येक पॅनेलकडून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. अनेक वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीकडे शेतकरी व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ३० मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून ३१ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.