महाराष्ट्रात मतदार याद्यांचे ‘विशेष सखोल पुनरिक्षण’; ९.८६ कोटी मतदारांच्या घरी जाणार निवडणूक यंत्रणा
मुंबई/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
भारत निवडणूक आयोगाने देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (SIR) मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर केला असून, त्यात महाराष्ट्राचा समावेश करण्यात आला आहे. या मोहिमेत राज्यातील तब्बल ९ कोटी ८६ लाखांहून अधिक मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, राज्यातील ९,८६,४४,४१३ मतदारांची माहिती मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरोघरी जाऊन तपासणार आहेत. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी विविध राजकीय पक्षांकडून नियुक्त करण्यात आलेले बूथ लेव्हल एजंट (BLA) देखील सहकार्य करणार आहेत.
🔶जूनपासून मोहिमेला सुरुवात
सध्या सुरू असलेल्या जनगणनेच्या कामाचा विचार करून या मोहिमेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रिया जून २०२६ पासून सुरू होऊन ऑक्टोबर २०२६ मध्ये पूर्ण होणार आहे.
🟡महत्त्वाचे वेळापत्रक
२० ते २९ जून २०२६ : बीएलओ प्रशिक्षण व पूर्वतयारी
३० जून ते २९ जुलै २०२६ : घरोघरी जाऊन मतदार पडताळणी
५ ऑगस्ट २०२६ : मसुदा मतदार यादी प्रसिद्ध
५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ : दावे व हरकती स्वीकारणे
७ ऑक्टोबर २०२६ : अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
🟢राजकीय पक्षांना आयोगाचे आवाहन
निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना प्रत्येक मतदान केंद्रावर बूथ लेव्हल एजंट (BLA) नियुक्त करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे मतदार याद्यांमधील दुबार नावे, मृत मतदारांची नोंद हटविणे तसेच नव्या पात्र मतदारांची नोंदणी अधिक अचूक आणि पारदर्शक पद्धतीने करता येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.