करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):- करमाळा, इंदापूर आणि कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असलेले ‘पुनर्वसन कार्यालय’ गेल्या अनेक वर्षांपासून करमाळा येथील जुन्या कोर्टाच्या इमारतीत कार्यरत आहे. मात्र, आता हे कार्यालय पंढरपूर येथे स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू असून, याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र विरोध दर्शवला आहे. हे कार्यालय करमाळ्यातच राहावे यासाठी तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधींनी महसूल मंत्री ना. विखे पाटील यांच्याकडे तातडीने पाठपुरावा करावा, अशी मागणी मनसे तालुकाध्यक्ष संजय (बापू) घोलप यांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना घोलप म्हणाले की, करमाळा तालुक्यातील अनेक शासकीय उपविभाग आधीच तालुक्याबाहेर आहेत. मुख्य कार्यालये करमाळ्यात नसल्यामुळे येथील बाजारपेठेची अवस्था बिकट झाली आहे. जर पुनर्वसन कार्यालयही तालुक्याबाहेर गेले, तर त्याचा थेट फटका शेतकरी वर्गाला बसणार आहे. साध्या कामासाठीही शेतकऱ्यांना पूर्ण दिवस खर्च करून, चौपट पैसे देऊन पंढरपूरला जावे लागेल. यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीचा अपव्यय होईल.
तालुक्याच्या विकासावर भाष्य करताना त्यांनी नेत्यांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. “करमाळा तालुका आज केवळ नावापुरता तालुका उरला असून, त्याची अवस्था एका मोठ्या खेड्यासारखी झाली आहे. येथे ना एमआयडीसी आली, ना मोठे उद्योग, ना मेडिकल किंवा इंजिनिअरिंग कॉलेज. आजवरच्या नेत्यांनी विकासासाठी काय केले हा प्रश्नच आहे, पण किमान आता जे हातात आहे ते तरी जपावे,” असे आवाहन त्यांनी केले.
तालुक्यातील आणि शहरातील नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन, हे कार्यालय कोणत्याही परिस्थितीत स्थलांतरित होऊ देऊ नये. सर्व आजी-माजी नेत्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सरकारच्या जलसंपदा आणि महसूल विभागाकडे ताकद लावावी, अशी नम्र विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.