शालार्थ आयडी प्रकरण गाजतंय; तपासाच्या भोवऱ्यात मोठी नावे?
अमळनेर : विक्की जाधव.
तालुक्यात उघडकीस आलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याने आता गंभीर वळण घेतले असून तपास यंत्रणा अधिक सक्रिय झाली आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने नुकतीच अमळनेर येथील ऍड. किरण पाटील यांची सखोल चौकशी करण्यात आली. नाशिक येथील विशेष पथकाने त्यांना दोन दिवसांसाठी नाशिक येथे नेऊन विविध बाबींवर तपास केला असल्याची माहिती समोर आली आहे. या हालचालीमुळे घोटाळ्याच्या तपासाला नवे धागेदोरे मिळाल्याची चर्चा सुरू आहे.दIDi crcriरम्यान, या घोटाळ्याचे जाळे अपेक्षेपेक्षा अधिक व्यापक असल्याचे संकेत मिळत आहेत. अमळनेर तालुक्यातील अनेक शाळा, संस्थाचालक, शिक्षक व संबंधित कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची बारकाईने तपासणी केली जात असून प्रत्येक घटकाची कसून चौकशी केली जाणार आहे. बनावट कागदपत्रे, नियमबाह्य नियुक्त्या आणि शासकीय प्रक्रियेत झालेल्या अनियमितता यांचा सखोल तपास सुरू असून यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणात लवकरच काही महत्त्वपूर्ण खुलासे होण्याची शक्यता असून दोषींवर कठोर कारवाईची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. या घोटाळ्यामुळे शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेली अस्वस्थता दूर करण्यासाठी तपास यंत्रणा कोणतीही तडजोड न करता कारवाई करणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत या प्रकरणात मोठी नावे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.