कुटुंबीय बाहेरगावी गेल्याने चोरट्यांनी साधली संधी ६४ हजार रुपयांचा मुद्देमालावर मारला डल्ला.
अमळनेर : विक्की जाधव.
कुटुंब पुण्याला गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घराचा कडी-कोंडा तोडून रोख रक्कम व सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एकूण ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना ४ एप्रिल रोजी ढेकू रस्त्यावरील जययोगेश्वर कॉलनीत उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वैशाली चंद्रकांत वाघ या १४ मार्चपासून आपल्या मुलाकडे पुणे येथे गेल्या होत्या. ४ एप्रिल रोजी मुलाच्या मित्राने त्यांच्या घराचा कडी-कोंडा तुटलेला असल्याची माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या मित्रांनी घरी जाऊन पाहणी केली असता घरातील कपाट उघडून साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले दिसून आले. ५ एप्रिल रोजी वैशाली वाघ अमळनेर येथे परत आल्यावर कपाटाचे कुलूप तोडून दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.चोरट्याने कपाटातील ३० हजार रुपयांच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, १२ हजार रुपये किमतीच्या चार अंगठ्या, १० हजार रुपये किमतीचे ३० भार चांदीचे दागिने आणि १२ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ६४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यात आली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१ (४) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहेत.