नळ फोडल्याने पाणीचं येईना” मंगला देवी चौक परिसरातील नागरिकांचा संताप ठेकेदाराची मनमानी, नगरपरिषद बघ्याची भूमिका?
अमळनेर : विक्की जाधव.
शहरातील मंगला देवी चौक व उर्दू शाळा परिसरात मागील तीन आठवड्यांपासून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः भटकंती करावी लागत आहे. परिसरातील पिण्याच्या पाण्याचे सर्व नळ फोडून ठेवण्यात आल्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत.

पाणी ही मूलभूत गरज असताना नागरिकांना पाण्यासाठी गेल्या तीन आठवड्यापासून त्रास सहन करावा लागत असल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

लोकांना सुविधा देण्याच्या नावाखाली प्रशासनानेच नागरिकांची मोठी गैरसोय केली असल्याची भावना परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत. पाणीपुरवठ्याच्या कामासाठी करण्यात आलेल्या कामात संबंधित ठेकेदाराची मनमानी सुरू असून काम पूर्ण न करता नळ तोडून ठेवले आहेत. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
अमळनेर नगरपरिषदेचे संबंधित प्रभागाचे नगरसेवक यांनी या गंभीर प्रश्नाकडे तात्काळ लक्ष देऊन नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, तसेच पालिकेने ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.