इतिहास, संस्कार आणि कृतज्ञतेचा धडा” प्रताप शेठजींना विद्यार्थ्यांचे अभिवादन.
अमळनेर : विक्की जाधव.
‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत येथील प्रताप हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व स्मरणीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेचे शिक्षक डी. एन. पालवे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला असून विद्यार्थ्यांना शाळेच्या संस्थापकांच्या कार्याची ओळख करून देण्यात आली.

यावेळी शाळेची स्थापना करणारे आदरणीय प्रताप शेठजी यांच्या महान कार्याची, शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची तसेच त्यांच्या दूरदर्शी विचारांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. पालवे सर यांनी विद्यार्थ्यांना प्रताप शेठजी यांच्या कार्याचा प्रेरणादायी परिचय करून देत त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध पद्धतीने प्रताप महाविद्यालयाच्या परिसरात नेण्यात आले. तेथे उभारण्यात आलेल्या प्रताप शेठजी यांच्या पुतळ्यासमोर विद्यार्थ्यांनी आदरपूर्वक अभिवादन केले.प्रताप शेठजी यांनी रुजवलेले शिक्षण, संस्कार व समाजसेवेचे मूल्य आजही संस्थेला दिशा देत असून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी अभिमान आणि शाळेशी असलेले नाते अधिक दृढ होत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमावेळी मुख्याध्यापक एस. बी. निकम यांच्यासह डी. एन. पालवे, एन. आर. पाटील, सचिन अहिरे, के. जी. कोळी, नम्रता दोरकर पाटील व जयश्री पाटील उपस्थित होते.