वादळी वाऱ्याचा अमळनेर तालुक्याला तडाखा; महावितरण कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनी वीजपुरवठा पूर्ववत
अमळनेर : विक्की जाधव.
शहरासह संपूर्ण तालुक्यात काल वादळी वाऱ्याने अक्षरशः रौद्र रूप धारण करत मोठे नुकसान केले. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून विजेच्या तारांवर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. काही ठिकाणी वीज खांब वाकले, तारा एकमेकांत अडकल्या तर रस्त्यावर झाडांच्या फांद्या पडल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. या अचानक आलेल्या वादळामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली असून परिसराला मोठा फटका बसल्याचे चित्र पाहायला मिळाले.
या परिस्थितीत जीव धोक्यात घालून उभे राहिले ते (महावितरण) चे वीज कर्मचारी. तुटलेले खांब, एकमेकांत अडकलेल्या तारा, झाडांच्या मोडलेल्या फांद्या यामध्येही त्यांनी काम सुरू ठेवत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले. अंधारात बुडालेल्या परिसरात पुन्हा उजेड आणण्यासाठी कर्मचारी रात्रभर झटत होते.महावितरण कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे अनेक भागातील वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत करण्यात यश आले.