गिलेटिनच्या स्फोटात घर जमीनदोस्त; कुटुंब उघड्यावर ग्रामसभेचा ठराव धाब्यावर; संबंधितांवर कारवाईची सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम यांची मागणी
अमळनेर :विक्की जाधव.
तालुक्यातील बोहरा येथे उपसा सिंचन योजनेच्या पाइपलाइनसाठी करण्यात येणाऱ्या खोदकामातील स्फोटामुळे एका गरिबाचे घर जमीनदोस्त झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिलीप बुधा भिल असे घरमालकाचे नाव असून सुदैवाने घटना घडली त्यावेळी घरात कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले असून गावकऱ्यांनी त्यांना तात्पुरता आसरा दिला आहे.

निम्न तापी प्रकल्प पाडळसे धरणाच्या उपसा सिंचन योजनेसाठी बोहरा गावाबाहेरून मुख्य पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी खोल चारी खोदताना अनेक ठिकाणी दगड लागत असल्याने जिलेटीनच्या साहाय्याने स्फोट करण्यात येत आहेत. १ तारखेला दिलीप भिल यांच्या घराजवळ स्फोट करण्यात आला होता. या स्फोटाच्या धक्क्याने त्यांचे संपूर्ण घर कोसळले. यापूर्वीही अनेक वेळा स्फोटांमुळे घरांना भूकंपासारखे धक्के बसत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. घटनेनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी पंचनामा केला असून नुकसान भरपाईची मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, या स्फोटांबाबत ग्रामसभेत स्फोट थांबवावेत तसेच नुकसानग्रस्तांना पुनर्वसन व योग्य मोबदला द्यावा असा ठराव करण्यात आला होता. मात्र या ठरावाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणी संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम यांनी केली आहे.