बोरी नदी पुलावर अतिक्रमणाचा कहर; वाहतूक कोंडीने वाहनधारक त्रस्त, कारवाईची मागणी
अमळनेर : विक्की जाधव.
शहरातील बोरी नदी पूल परिसरात सध्या अतिक्रमणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून वाहतूक कोंडीमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. पुलावर लोड गाड्या, ढकल गाड्या तसेच सफरचंद व नारळ विक्रेते मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गाड्या लावून व्यवसाय करत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. हा रस्ता शहरातील अत्यंत वर्दळीचा असून दिवसभर येथे वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होत आहे.

स्थानिक नागरिक व वाहनधारकांच्या मते, पुलावर आधीच रस्ता अरुंद आहे, त्यातच किरकोळ विक्रेते पुलाच्या दोन्ही बाजूंना अतिक्रमण करून गाड्या उभ्या करतात. त्यामुळे दोन वाहने समोरासमोर आली की वाहतूक पूर्णपणे थांबते आणि मोठी कोंडी होते. यामुळे अनेक वेळा वादविवादाचे प्रकार देखील घडत असून वाहनधारकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

या प्रकरणी संबंधित प्रशासनाने तात्काळ कारवाई करून पुलावर गाड्या लावण्यास प्रतिबंध करावा, अतिक्रमण हटवावे व वाहतूक सुरळीत करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.