पीबीए इंग्लिश मीडियम स्कूलची ‘भाग्यश्री’ चमकली; डॉ. होमी भाभा फाउंडेशन परीक्षेत जिल्ह्यात तिसरा क्रमांक!
अमळनेर : विक्की जाधव.
पी बी ए इंग्लिश मीडियम स्कूलची इयत्ता ८ वीची विद्यार्थिनी कु. भाग्यश्री पाटील हिने डॉ. होमी भाभा फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या विज्ञानाधारित स्पर्धा परीक्षेत प्राविण्यसह यश संपादन करत जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. कठीण आणि बौद्धिक क्षमतेची कसोटी पाहणाऱ्या या परीक्षेत यश मिळवत तिने विभागीय स्पर्धेसाठी आपली दमदार निवड निश्चित केली आहे. शाळेच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवणारी ही कामगिरी ठरली आहे.

ही परीक्षा तीन स्तरांमध्ये घेतली जाते. पहिल्या व दुसऱ्या स्तरात अत्यंत अवघड व विश्लेषणात्मक प्रश्नांचा भडिमार असतो, तर तिसऱ्या स्तरात मौखिक परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांची वैज्ञानिक समज, विचारशक्ती व सादरीकरण कौशल्य तपासले जाते. या सर्व टप्प्यांतून यशस्वीरीत्या मार्गक्रमण करत भाग्यश्रीने आपली जिद्द, एकाग्रता आणि वैज्ञानिक दृष्टीकोन सिद्ध केला. विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन तसेच स्वाती माळी यांचे विशेष सहकार्य तिला लाभले.
सदर यशामुळे भाग्यश्रीला तृतीय पात्रता फेरीसाठी मुंबई येथे वैज्ञानिक शैक्षणिक सहलीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. शाळेचे चेअरमन डॉ. संदेश गुजराथी, मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तिच्या या दैदिप्यमान यशामुळे शाळेसह अमळनेर शहराचा मान उंचावला आहे.