करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- करमाळा येथील पंचशील स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शालेय तालुका स्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत श्री. गिरधरदास देवी विद्यालयाने देदीप्यमान यश संपादन केले आहे. या स्पर्धेत प्रशालेच्या खेळाडूंनी आपल्या चपळाईने आणि वेगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
सर्वात लक्षवेधी कामगिरी ठरली ती इयत्ता ५ वी मधील विद्यार्थिनी कु. विभा विलास आलदर याची. तिने स्वतःपेक्षा मोठ्या गटात (इ. ८ वी ते १० वी) सहभाग नोंदवून, ४ किलोमीटरचे अंतर अवघ्या १७ मिनिटांत पार केले. या कामगिरीसह विभाने तालुक्यामध्ये एक नवा उच्चांक प्रस्थापित करत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
तसेच लहान गट मुले (इ. ५ वी ते ७ वी) विभागात इयत्ता ७ वी मधील विद्यार्थी श्रेयश दत्तात्रय शिंदे याने ३ किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये उत्कृष्ट धावपळ करत प्रथम क्रमांक मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

या यशाबद्दल श्री. गिरधरदास देवी प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि प्रशालेच्या वतीने खेळाडूंचा गौरव करण्यात आला.
यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कन्हैयालाल देवी अध्यक्ष, श्री. गिरधरदास देवी प्रतिष्ठान, अमोदशेठ संचेती सचिव, सुनिता देवी मॅडम खजिनदार, विजयकुमार दोशी व श्री. अनुज देवी सदस्य, संभाजी जगताप सर मुख्याध्यापक या यशस्वी खेळाडूंना प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्री. जितेंद्र शिंदे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या उत्तुंग यशाबद्दल शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून त्यांचे मनापासून अभिनंदन होत आहे.
